या गावात होत आहे शेतातून कृषिपंपाची चोरी! पोलिसात तक्रार दाखल

0
22

रेवनाथ गाढवे/मोहाडी : तालुक्यातील निलज बु. भागातील शिवारातून सतत कृषिपंप चोरीला जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. करडी परिसरात कृषिपंप चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचा संशय शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. निलज येथील महादेव शिवराम कांबळे यांच्या शेतातील फिल्टर वरून रविवारी रात्री पंप चोरीला गेला आहे. तसेच हजारो रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लांबविले आहे. पुढील काही दिवसात रब्बी पिकाची पेरणी करायची आहे. अशावेळी कृषिपंपांची चोरी होत असल्याने शेती कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पिकाच्या सिंचनासाठी नवीन पंप बसविण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, शिवारातून सतत कृषिपंप चोरीच्या घटना होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

आतापर्यंत भाऊराव तुकाराम बोंदरे, धनराज ढिवरू कांबळे, गणपत भिवाजी कांबळे, प्रमोद वसंता गाढवे यांच्या शेतातील कृषिपंप चोरीला गेले आहे. त्यांनी करडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांना अद्याप या चोरीचा सुगावा लागला नाही. पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर त्याबाबत तपास करत नसल्याने चोरट्यांचे फावले आहे.. शेतात कृषिपंप बसविण्यासाठी ५० हजारांपेक्षा अधिक खर्च येतो. शेतातील कृषिपंप चोरीला गेल्याने शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत.

नैसर्गिक संकटाचा सामना करीत शेतकरी उत्पन्न वाढीचा प्रयत्न करीत आहेत. उन्हाळी हंगामात उत्पादन घेण्यासाठी सिंचनावर भर द्यावा लागतो. मात्र परिसरात शेतकऱ्यांना या मानवनिर्मित संकटाला सामोरे जावे लागत आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन चोरट्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.