भिलाईतील नराधमाचा गायीवर लैंगिक अत्याचार; गोंदिया आरपीएफने आवळल्या मुसक्या

0
41

गोंदिया : छत्तीसगड राज्यातील भिलाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जामूल येथील एका गायीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला गोंदिया आरपीएफने मंगळवार, ३० मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास फलाट क्रमांक तीनवर आलेल्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून अटक केली. दरम्यान, आरोपीला आज, बुधवारी भिलाई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

हसन खान (रा. जामूल, भिलाई ह. मु.) असे आरोपीचे नाव आहे. छत्तीसगढ राज्यातील भिलाई जिल्ह्यातील जामूल येथील गृहनिर्माण मंडळातील भाड्याच्या घरात दिल्लीहून येथे आलेल्या हसन खान आपल्या नातेवाईकांसोबत राहत होता. तो फेरी करून कपडे विक्रीचा व्यवसाय करत होता. आरोपी हसन खान या नराधमाने २७ मे रोजी रात्रीच्या सुमारास एका गायीवर अत्याचार केला होता. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जामूल येथील विविध सामाजिक, राजकीय पक्षातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याचा विरोध करत निदर्शन केले, तसेच त्या आरोपीला पकडून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.दरम्यान, आरोपी फरार झाल्याची माहिती भिलाई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व पोलीस स्टेशन आणि रेल्वे पोलिसांना दिली. तो गोंदियाकडे जाणाऱ्या गाडीत बसल्याची माहिती मिळाली असता गोंदिया आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व रेल्वे गाड्यांची कसून चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. मंगळवार, ३० मे रोजी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून बसून तो गोंदियाहून जात होता. मात्र, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस गाडी गोंदिया येथील फलाट क्रमांक ३ वर आली असता चौकशी करण्यात आली व आरोपी हसन खान याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, भिलाई पोलीसचे कर्मचारी आज गोंदिया रेल्वे पोलिसात दाखल झाले. नंतर त्या आरोपीला गोंदिया आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी भिलाई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.