‘युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ एकेडमी’ (उमला) तील पाच विद्यार्थी होणार सहभागी
मुंबई, दि. 31 मे: २ ते ९ जून २०२३ या दरम्यान नेदरलँड येथे आयोजित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठातील पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ एकेडमी (उमला) तील नाथन शिंदे, विष्णूप्रिया भोसले, नेक पूरी, आर्या गौतम आणि आरुषी केनिया या पाच विद्यार्थ्यांना प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या मूट कोर्ट स्पर्धेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल क्रिमीनल कोर्ट हेग, नेदरलँड येथे प्रतिनिधीत्वाची मोठी संधी त्यांना मिळाली आहे. लिडेन विद्यापीठ नेदरलँड यांच्या सहकार्याने इंटरनॅशनल क्रिमीनल कोर्टाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत ८० देशातील संस्था सहभागी होणार आहेत.
इंटरनॅशनल क्रिमीनल कोर्टाच्या वतीने भारतातील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली मार्फत १६ ते १९ मार्च २०२३ दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशातील विविध विद्यापीठातील ३५ संस्था या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत वार क्राईम, क्राईम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटीज् आणि इकोसाईड या नाविण्यपूर्ण विषयांवर सादरीकरन करून ‘उमला’च्या विद्यार्थ्यांनी पहिल्या पाच चमूमध्ये येण्याचा बहुमान मिळवला. ‘उमला’ च्या संचालिका प्रा. राजेश्री वऱ्हाडी यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. मार्गदर्शक म्हणून प्रा. राजेश्री वऱ्हाडी यासुद्धा चमूसह नेदरलँडला रवाना होत आहेत. नेदरलँड येथे आयोजित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या ‘उमला’च्या विद्यार्थ्यांनी निवड ही कौतूकास्पद असल्याचे सांगून विद्यापीठाच्या वतीने प्रभारी कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के, प्रभारी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि प्रभारी कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड यांनी या चमूचे अभिनंदन करून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.