कुंभकोट जंगलातून ५५ लाखांची दारू जप्त

0
9

गडचिरोली,दि.13ः- येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ जानेवारी रोजी कोरची तालुक्यातील कुंभकोट येथील सुखदेव कल्लो यांच्या घरून ६0 लाखांची दारू जप्त केली होती. आज १२ जानेवारी रोजी कोरची पोलिसांनी पुन्हा कुंभकोट नजीकच्या जंगल परिसरात धाड टाकून ५५ लाख २९ हजार ५00 रूपयांची दारू जप्त केली. कोरची पोलिसांनी आठवडाभरात तब्बल १ कोटी १४ लाख ६९ हजार ५५0 रूपयांची दारू जप्त केल्याने दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
कोरची तालुक्यातील कुंभकोट जंगल परिसरात दोन वाहनामध्ये दारू असल्याची माहिती कोरची पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक तवाडे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळ गाठून दोन्ही वाहनात असलेली दारू जप्त केली. मात्र यातील आरोपी फरार झाले असले तरी ही दारू निर्मल धमगाये याची असल्याचे पोलिस उपनिरीक्षक तवाडे यांनी सांगितले.
कोरची या अविकसीत तालुक्यात करोडो रूपयांच्या दारूची उलाढाल मागील ३ ते ४ वर्षापासून सुरू आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक कोरचीत येऊन दारू पकडतात मग कोरची तालुक्यातील पोलिस काय काम करतात? हा यक्षप्रश्न पडला होता. परंतु पोलिस अधिकारी आता जागे झाले आहेत. अवैध दारू विक्रेता निर्मल धमगाये याच्या विरोधात कोरची पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ ई ८३,९८ (२) व १८८ भांदवि कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पकडण्यासाठी कोरची पोलिस सवरेतोपरी प्रयत्न करीत आहेत. निर्मल धमगाये याला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक तवाडे यांनी दिली.