विनयभंग करणार्यास सहा महिन्याची शिक्षा

0
20

भंडारा,दि.14ः-शाळेतून घरी परत येणार्‍या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या आरोपीला भंडारा सत्र न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षा ठोठावली. निखील बबन लोणारे रा. भागडी असे शिक्षा सुनावल्या गेलेल्या आरोपीचे नाव आहे.
लाखांदूर पोलिस स्टेशनअंतर्गत ग्राम परसोडी (नाग) येथिल पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी ही जवळील एका शाळेत शिक्षण घेत होती. दि. ७ जानेवारी २0१६ रोजी ती मैत्रीणीसोबत शाळेतून परत येत असताना निखील लोणारे रा. भागडी, सोमेश्‍वर खरोले रा. चिचोली व अजय गोस्वामी रा. मांढळ या तीन तरूणांनी दुचाकीने तिचा पाठलाग केला. त्यानंतर दुचाकी तिच्यासमोर उभी करून विनयभंग केला.
सदर प्रकाराची माहिती मुलीने घरी दिली. याप्रकरणी लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तिनही आरोपींविरुद्ध कलम ३५४ (ड) (२), ३४ भादंवि सहकलम ११ (१)(४), १२ बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २0१२ अन्वये गुन्हा दाखल केला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद राऊत यांनी सुरू केला. तिनही आरोपींना अटक करून साक्षपुरावे गोळा केले. त्यानंतर विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. सदर प्रकरण जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधिश संजय देशमुख यांच्या समक्ष चालले.
१२ जानेवारी रोजी न्यायालयाने आरोपी निखिल बबन लोणारे यास दोषी ठरवून सहा महिन्याचा कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अँड. विश्‍वास तवले यांनी बाजू मांडली. पोलीस निरीक्षक बन्सोडे यांचे मार्गदर्शनात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार सुरेश भलावी काम पाहीले.