३० तासानंतर मिळाला शोभेलालचा मृतदेह

0
17

गोंदिया,दि.14 : सूर्याटोला येथील तलावात म्हशी धुण्यासाठी गेलेला शेतकरी तलावात बुडाल्याची घटना शुक्रवारी (दि.१२) रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. मात्र तलावात बुडालेल्या शेतकऱ्याचा शोध शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत लागला नव्हता. त्यामुळे शनिवारी (दि.१३) स्थानिक मासेमार आणि बोटीच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली होती. पण यात अपयश आल्याने नागपूर येथील एसडीआरएफच्या टिमला पाचारण करण्यात आले. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बुडालेला शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. यात सुमारे तीस तासांचा कालावधी लागला.
शोभेलाल बघेले (५५) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शोभेलाल व त्यांच्या घराजवळील दोन शेतकरी म्हशी धुण्यासाठी सुर्याटोला तलावावर गेले होते. दरम्यान म्हशी धुत असताना शोभेलालचा तोल गेल्याने ते तलावात बुडाले. काही अंतरावर असलेल्या दोन शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार लक्षात येतातच त्यांनी शोभेलाल ला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना शोभेलाल सापडला नाही. यानंतर त्यांनी याची माहिती पोलीस व गावकऱ्यांना दिली. माहिती मिळताच गावकरी व पोलीसांनी सुर्याटोला तलावाकडे धाव घेत शोध मोहीम सुरू केली.  शोभेलालचा मृतदेह न सापडल्याने जिल्हा प्रशासनाने नागपूर येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) टिमला पाचारण केले.सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एसडीआरएफची टिम घटनास्थळी दाखल झाली. यानंतर त्यांनी तलावात शोध मोहीम सुरू केली. सायंकाळी ६ वाजताच्या शोभेलालचा मृतदेह शोधण्यात या टिमला यश आले.