पोलिसांना पाहताच चंदन तस्कर पसार; दुचाकीसह साहित्य जप्त

0
30

वर्धा,दि.14 : गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवाग्राम भागातील तलाव परिसरात सुमारे तीन जण संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. परंतु, पोलीस येत असल्याची चुणूक लागताच चंदन तस्कर असलेल्या तिन्ही व्यक्तींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून चंदनाचे लाकूड, दोन दुचाकी, कुऱ्हाड तसेच कटर जप्त केले आहे.
गत काही दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील बजाजवाडी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निवास स्थानावरून अज्ञात चोरट्यांनी चंदनाचे मोठाले झाड तोडून नेले होते. दोन्ही घटनांची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे. तेव्हापासून चंदन चोर व चंदनाची तस्करी करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत होते. दरम्यान तीन अज्ञात क्ती सेवाग्राम भागातील तलाव परिसरात संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती प्राप्त होताच दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. दरम्यान संधी साधून तिनही संशयीतांनी दुचाकी व इतर साहित्य तेथेच सोडून घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसराची बारकाईने पाहणी केली असता त्यांना चंदनाचे लाकूड व दुचाकी तसेच लाकूड कापण्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्र आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांची आपल्या चमुसह घटनास्थळ गाठले. या घटनेची शहर पोलिसांनी नोंद घेतली असून पसार झालेल्या चंदन तस्करांचा शोध पोलीस घेत आहेत.