प्रयोगशाळा परिचराला लाच घेताना अटक

0
6

भंडारा,दि.06ः-पदवीच्या प्रथम वर्षाच्या समाजशास्त्र विषयात इंटरनलमध्ये मिळालेले गुण वाढवून देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना येथील ज. मु. पटेल महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा परिचराला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई सोमवारी ज. मु. पटेल महाविद्यालयात करण्यात आली. विनोद मारोतराव नक्षुलवार (४५) असे अटक केलेल्या प्रयोगशाळा परिचराचे नाव आहे.ज. मु. पटेल महाविद्यालयात पदवीच्या कला शाखेत शिकणार्‍या विद्यार्थ्याने प्रथम वर्षाची परीक्षा दिलेली आहे. त्याला प्रथम वर्षात समाजशास्त्र या विषयात इंटरनलचे फक्त एक गुण मिळाले होते. त्याबाबत महाविद्यालयात जाऊन प्रयोगशाळा परिचर नक्षुलवार याला विचारपूस केली असता त्याने गुण वाढवून देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली.
या प्रकरणाची तक्र ार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्र ारीवरून सापळा रचण्यात आला. सापळा कारवाई दरम्यान नक्षुलवार याने समाजशास्त्र विषयाच्या इंटरनलचे गुण वाढवून देऊन पास करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्ष कारवाईदरम्यान दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली. नक्षुलवार याचेविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात कलम ७,१३ (१) (ड) सहकलम १३ (२) लाप्रका १९८८ १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश्‍वर पारधी करीत आहेत.ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक योगेश्‍वर पारधी, पोलीस हवालदार संजय कुरंजेकर, गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्‍विनकुमार गोस्वामी, शेखर देशकर, पराग राऊत, कोमलचंद बनकर, दिनेश धार्मिक यांनी केली.