एक हजार रुपयांची लाच घेताना शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांना अटक

0
7

अकोला,दि. १३: जातवैधता सादर न करू शकल्याने सेवा समाप्त झालेल्या एका शिक्षीकेला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याच्या मोबदल्यात तिच्याकडे एक हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या  अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात वरिष्ठ सहायक व कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी लाच घेताना रंगेहात अटक केली.  कैलास वासूदेव मसने (४७)व रामप्रकाश आनंदराव गाडगे (५५)अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
आकोट येथील तक्रारदाराच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराची पत्नी शिक्षीका असून, जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकल्याने तीची सेवा शिक्षण विभागाकडून समाप्त करण्यात आली होती. त्यानंतर सदर शिक्षिकेने विभागीय आयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर सेवा समाप्तीच्या आदेशास स्थगिती मिळाली. त्यानंतर सदर शिक्षीकेला परत सेवेत रुजू करून घेण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याकरीता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात वरिष्ठ सहायक पदावर कार्यरत असलेल्या कैलास वासूदेव मसने व कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर तात्पूरत्या नेमणुकीवर कार्यरत असलेल्या रामप्रकाश आनंदराव गाडगे या दोघांनी शिक्षीकेच्या पतीकडे (तक्रारदार) एक हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. त्यानूसार ‘एसीबी’च्या पथकाने मंगळवारी सापळा रचला. तक्रारदाराकडून आरोपींनी एक हजार रुपयांची रक्कम स्विकारताच दबा धरून बसलेल्या ‘एसीबी’च्या पथकाने दोघांना रंगेहाथ अटक करून, त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त केली.
एसीबी अमरावती परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, अकोला एसीबीचे उपअधिक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वात पोलिस शिपाई संतोष, सुनील, इंगळे, येलोने, प्रवीण यांनी ही कारवाई केली.