महाराष्ट्र दर्शन सहलीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
नागपूर,दि. १३: ह्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श बाळगून विद्यार्थ्यांनो शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करून स्वतःचा व गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावा, असे आवाहन नक्षल विरोधी अभियानाचे पोलिस उपअधिक्षक संजीव म्हैसेकर यांनी केले.
शासनामार्फत राबविण्यात येणा-या गडचिरोलीतील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र दर्शन सहल नागपूरात आली असता नक्षल विरोधी अभियान, महाराष्ट्र राज्य, नागपूर तर्फे सुराबर्डी येथील अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
मंचावर अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य तथा पोलिस उपअधिक्षक दिपक पाटील उपस्थित होते.
नक्षली हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी खोट्या भुलथापा देऊन लहान वयात विद्यार्थ्यांना नक्षल चळवळीत सहभागी करीत असल्याचे सांगत श्री. म्हैसेकर म्हणाले की, ज्येष्ठ नक्षली नेते आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून स्वतःच्या मुलांना चांगले शिक्षण देत आहेत. त्यांची मुले उच्च शिक्षीत असून अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये लठ्ठ पगारावर नोकरीला आहेत. सातत्याने आदिवासी बांधवांची दिशाभुल होत असून नक्षल्यांकडून गडचिरोलीतील शिक्षण, आरोग्य व इतर पायाभुत सुविधांना विरोध करून गडचिरोलीच्या विकासात अडथळा निर्माण केला जात आहे. नक्षली शासनाच्या विकासकामांना विरोध करतात. यामुळे नक्षल्यांचा हेतु काय आहे, हे स्पष्ट दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांनी नक्षल्यांच्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता आपले लक्ष केवळ शिक्षणाकडे केंद्रीत करावे. शिक्षणामुळे चांगली व वाईट विचारसरणी काय आहे, हे आपल्याला कळेल. त्यामुळे शिक्षणाद्वारे स्वतःचा व गडचिरोलीचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, गडचिरोलीच्या विकासासाठी शासन कटीबध्द असून विद्यार्थी हे गडचिरोली व देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांना या सहलीच्या माध्यमातून गडचिरोलीच्या बाहेरील जिवनाचे प्रत्यक्ष निरीक्षण करता आल्यामुळे पुढील आयुष्यासाठी नवी दिशा मिळाली आहे. याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी पुढे उच्च शिक्षण घेऊन स्वतःची प्रगती करून गडचिलीच्या विकासासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ही १९ वी सहल असून यात गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम व अतिदुर्गम भागातील एकूण ७८ विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. या सहलीतील विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, नाशिक, शेगाव, नागपूर आदी शहरांना भेटी देऊन तेथील शहरांचा झालेल्या औद्योगिक, शैक्षणिक विकास आदींची माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी नागपूरातील रमन विज्ञान केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, दीक्षाभूमी आदी विविध ठिकाणांना भेटी देऊन विविध माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना जयश्री चित्रपटगृहात बाळ भिमराव हे चित्रपट दाखविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी चित्रपटातील मुख्य भुमिका निभावणारे बाल कलाकार मनिष कांबळे, अभिनेत्री निशा भगत यांच्यासह त्यांच्या चमुशी प्रत्यक्ष संवाद साधला.
तसेच विद्यार्थ्यांनी यवतमाळ येथे पोलिस हवालदार पदावर कार्यरत असलेले चित्रकार शेखर मारोतराव वांढरे यांच्या अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्रातील आदिवासी वारली चित्रकला प्रदर्शनाला भेट दिली. श्री. वांढरे यांनी आदिवासी वारली चित्रकलेबाबात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वांढरे यांच्यासोबत यवतमाळ पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर सवाने, नायक पोलिस शिपाई महेंद्र शेंदुरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विशेष माहिती व जनसंपर्क कक्षाचे प्रभारी सहायक संचालक हंसराज राऊत यांनी केले. कार्यक्रमात गडचिरोलीचे पोलिस उपनिरीक्षक श्री. जगदाळे, महिला पोलिस उपनिरीक्षक चौधरी, नक्षल विरोधी अभियानाचे पोलिस हवालदार दिनकर चांभारे, नायक पोलिस शिपाई सुभाष तानोडकर, देवशरण यादव यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी व सहलीतील विद्यार्थी उपस्थित होते.





