आयपीएल सट्टय़ावर नागपूर पोलिसांची धाड,१७ जणांना अटक

0
18

भंडारा, दि.१५ : भंडारा शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर खेळल्या जाणार्‍या सट्टय़ाच्या अड्डय़ावर नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकून १७ जणांना अटक केली. या कारवाईत एक लाख रुपये रोख व अन्य साहित्य असा २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्र वारी रात्री ११ च्या सुमारास म्हाडा कॉलनी येथील प्रेमदास मोहन रंगारी यांच्या घरी करण्यात आली. शहरात क्रिकेट सामन्यांवर लाखोंचा सट्टा सुरू असताना भंडारा पोलिस काय करीत होते? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.याप्रकरणामुळे भंडारा पोलीस अधिक्षकांची विकेट जाणार असल्याचे बोलले जात आहे.
नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍याला भंडारा येथे आयपीएल क्रिकेटवर मोठा सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी आपल्या अधिकार्‍यांना भंडारा येथे पाठवून माहितीची शहानिशा करून घेतली. तीन दिवसांच्या पाहणीनंतर खबर पक्की असल्याचे समजताच नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेची चमू तयार करण्यात आली. शुक्रवारी संध्याकाळी ही चमू भंडार्‍याला रवाना झाली. रात्री ११ च्या सुमारास या चमूने म्हाडा कॉलनीतील प्रेमदास रंगारी यांच्या एमआयजी ३६ या घरी छापा मारला. या घराच्या वरच्या दोन्ही माळयावर १७ इसमांकडून क्रिकेट सट्टय़ाच्या बुकींगचे काम सुरू होते.
हा सट्टा राजू सत्यनारायण अग्रवाल रा. पारडी नागपूर, लक्ष्मण गोपालदास हरचंदानी रा. जरीपटका नागपूर, फिरोज बदरूद्दीन मैदानी रा. ख्वाजा मस्जिद गोंदिया यांच्या नेतृत्वात चालविला जात होता. तर शेख अमजद शेख रमजान रा. शांतीनगर नागपूर, अमन किशोर कपूर रा. इतवारी नागपूर, राहूल सुरेंद्र जैन, गज्जू मदनलाल अग्रवाल, विवेक जैस्वाल रा. सदर नागपूर, कुलदिपसिंग जगिरा सिंग गिट्टल रा. टेकानाका नागपूर, भाऊराव डोंगरे रा. कामगार नगर, प्रमोद डोंगरे रा. मानेवाडा, प्रवीण करणलाल गुप्ता रा. पारडी, लालचंद आत्माराम ईदनानी रा. जरीपटका, मनोज गुरुमुख आलवानी, अर्जुन अमरजितसिंग राजपूत रा. मंगळवारी व आशिष राजेश चौरसिया हे सट्टा घेण्याचे काम करीत होते. या सर्वांना अटक करण्यात आली.नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या मोठय़ा कारवाईमुळे भंडारा पोलिस संशयाच्या फेर्‍यात आले आहे. भंडारा शहरात आयपीएलवर मोठा सट्टा सुरू असल्याची माहिती नागपूरच्या पोलिस अधिकार्‍यांना मिळू शकते. परंतु, भंडारा पोलिस याबाबत अनभिज्ञ कसे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मागील वर्षी राष्ट्रीय महामार्गावरील एका फ्लॅटमध्ये असाच मोठय़ा सट्टयावर भंडारा पोलिसांनी धाड टाकली होती. परंतु, आतातर बाहेर जिल्ह्यातील बुकी भंडार्‍यात येऊन सट्टा खेळतात आणि स्थानिक पोलिसांना याची माहिती मिळू शकत नाही, याचेच नवल वाटत आहे.म्हाडा कॉलनी येथील या घराच्या दुसर्‍या माळयावर सुरू असेलला या अड्डय़ात इंटरनेटसंबंधी सर्व यंत्रे बसविण्यात आली होती. इंटरनेटच्या माध्यमातून क्रिकेट मॅच सोबतच बुकींग घेण्याचे काम या बुकींकडून होत होता. याशिवाय मोबाईल लाईन नियंत्रित करणार्‍या विशेष प्रकारच्या आठ मशिन त्यांच्याकडून आढळून आल्या. या बुकींकडे सुमारे २३0 मोबाईल व २00 पेक्षा अधिक वेगवेगळ्या नंबरचे सीम कार्ड जप्त करण्यात आले. या बुकींसाठी असलेली एक मारुती स्विफ्ट कार क्रमांक एमएच ४९ बी ४२७७ तथा मारूती सीए ४ क्रमांक एमएच ३१ ई २५0 व एक एक्टिव्हा मोपेड पोलिसांनी जप्त केली.