आठ हजारांची लाच स्वीकारणार्‍या दोघांना अटक

0
8

नागपूर,दि.23ः-सोलर पॅनल बसविल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून सबसिडी मिळवून देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्ध जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
शीतलकुमार अरुण खोब्रागडे (३0) व अमन सुरेश बंसोड (१८) अशी लाच स्वीकारणार्‍यांची नावे आहेत. तक्रारदार हे नागपुरातील रहिवासी आहेत. ते सोलर पॅनल इन्स्टालेशनचे काम करतात. विशेष म्हणजे यासाठी संबंधित कार्यालयाकडून सबसिडी मिळते. अलीकडेच त्यांनी त्यांचे मित्राचे घरी सोलर प्लांट बसविला. परंतु त्यांना सबसिडी मिळाली नाही. त्यांनी शीतल खोब्रागडे याच्याशी संपर्क साधला.
शीतलने महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण कार्यालयात ओळख असल्याचे सांगितले. तसेच मित्राकडे बसविलेल्या सोलर पॅनलची सबसिडी मिळवून देण्याकरिता ८ हजार रुपयांची मागणी केली.मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी एसीबीकडे धाव घेतली. रितसर तक्रार नोंदविली. तक्रारी संबधी खात्री पटल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने ८ हजार रुपये शीतलने सांगितलेला युवक अमन बंसोड याच्याकडे सोपविली. त्याच्याकडून शीतलने लाच स्वीकारताच पथकाने दोघांनाही पकडले. त्यांच्याविरुद्ध जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. ही कारवाई पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख, मोनाली चौधरी, पोलिस हवालदार कळंबे, पोलिस शिपाई प्रभाकर बले, दीप्ती मोटघरे, रेखा यादव, मनोहर डोईफोडे यांनी पार पाडली.