महिला पोलिस उपनिरीक्षकास लाच घेताना अटक

0
6

वर्धा,दि.20ः-जिल्ह्यातील सेलू पोलिस स्टेशन येथे कर्तव्यावर असणार्‍या महिला पोलिस उपनिरीक्षक रार्जशी रामटेके यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्धा पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई दिनांक १९ जून रोज मंगळवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास सेलू पोलिस स्टेशन येथे करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारकर्त्याच्या लहान भावाचे विरोधात सेलू पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल होता. पीडित महिलेने प्रकरण आपसातील असल्याने प्रतिज्ञापत्रावर पुढील कारवाई न करण्यासाठी विनंती केली होती. परंतु सदर गुन्ह्यात तपासी अधिकारी महिला पोलिस उपनिरीक्षक रार्जशी रामटेके यांनी कारवाई न करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्धा पथकाने १ जून रोजीच पडताळणी केली होती. आज रोजी मंगळवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सेलू पोलिस स्टेशन येथे सापळा रचला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक रार्जशी रामटेके यांनी तक्रार कर्त्याकडुन २५ हजार रुपये रोख स्वीकारतांना रंगेहाथ अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून लाचेच्या स्वरूपात स्वीकारण्यात आलेले २५ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक नागपूर पी. आर. पाटील व अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजेंद्र नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा येथील पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब गावडे, पोलिस निरीक्षक सुहास चौधरी, पोलीस नाईक अतुल वैद्य, श्रीधर उईके, रोशन निंबाळकर, सागर भोसले, विजय उपासे यांच्यासह महिला पोलिस शिपाई लिना सुरजुसे यांनी केली.