स्थानांतरण होऊनही खंविअचा विकासकामात हस्तक्षेप

0
13

गोंदिया,दि.१९ : गोरेगाव पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी हरिणखेडे यांचे तिरोडा येथे स्थानांतरण झाले. असे असले तरी गोरेगाव पंचायत समितीअंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून लाभार्थ्यांकडून व इतर बिल मंजूर करण्यासाठी हस्तक्षेप करून आपला हित साधत असल्याचा आरोप माजी जि.प. सभापती मोरेश्वर कटरे यांनी केला आहे.

खंड विकास अधिकारी हरिणखेडे हे वैयक्तिक लाभाच्या योजना किंवा कुशल कामांचे बिल ऑनलाईन करण्यापासून तर मजुरी काढण्यापर्यंत हस्तक्षेप करीत असून, जोपर्यंत त्यांचे हित साध्य होत नाही तोपर्यंत लाभार्थ्यांचे बिल ऑनलाईन होत नाही. चिचगाव येथील शौचालय बांधकाम लाभार्थ्यांनी स्वत: रुपये लावून केले. मात्र, वर्षभरानंतरही त्यांचे बिल काढण्यात आलेले नाही. प्रति शौचालय ५०० रुपये घेतल्यानंतरच ते बिल काढत असल्याचा आरोपही कटरे यांनी केला आहे. त्यातच कंत्राटी पद्धतीने झालेल्या बांधकामाचे बिल मात्र त्वरित देण्यात येतात. गोरेगाव पंचायत समितीमध्ये हा प्रकार मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. हरिणखेडे यांचे स्थानांतरण झाले असले, तरी आवश्य कामांच्या फाईल त्यांनी स्वत:कडे राखून ठेवल्या आहेत. ज्या लाभार्थ्याकडून त्यांचे हितसंबंध पूर्ण होते, त्याच फाईलला ते मंजुरी देत आहेत. मनरेगाच्या वैयक्तिक लाभाचे कामाचे बिल जसे शौचालय बांधकाम, जनावरांचे गोठे, विहीर बांधकाम, कुशल कामाचे रस्ते, नाली बांधकाम आदी कामांतही टक्केवारीशिवाय बिल मंजूर करीत नसल्याचा आरोप कटरे यांनी केला असून, सदर प्रकरणाची चौकशी करून भ्रष्ट खंड विकास अधिकार्‍यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून मोरेश्वर कटरे यांनी केली आहे.