वसुलीसाठी आलेला पीएसआय लोखंडे निलंबित

0
10

नागपूर,दि.10ःक्रिकेट सट्ट्याची वसुली करण्यासाठी चंद्रपुरातील बुकींसोबत नागपुरात आलेला पीएसआय दिलीप मारुती लोखंडे (वय ३२) याला नागपुरात अटक झाल्याचे कळताच चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी निलंबित केले. दरम्यान, प्रतापनगर पोलिसांनी त्याला आणि त्याचे साथीदार रोहित लक्ष्मीचंद गुल्लानी (वय २३, फवारा चौक, मूल, जि. चंद्रपूर) तसेच रितिक हिम्मत मेश्राम (वय २३, रा. म्हारोडा, ता. मूल) यांना आज न्यायालयात हजर करून, त्यांचा ११ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला.खामल्यातील सिंधी कॉलनीत राहणारा कन्हैया हरिशचंद करमचंदानी (वय २७) याच्याकडे गुल्लानी आणि मेश्राम या बुकींचे आयपीएल सट्ट्याचे १ लाख २० हजार रुपये शिल्लक होते. त्यातील ३५ हजार करमचंदानीने आरोपींना दिले. ८५ हजार रुपये मिळावे म्हणून गुल्लानी आणि मेश्रामने करमचंदानीच्या मागे तगादा लावला होता. तो रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे पाहून, गुल्लानी आणि मेश्राम या दोघांनी चंद्रपूरच्या कंट्रोल रूममध्ये असलेला पीएसआय दिलीप लोखंडे याला सुपारी दिली. त्यानुसार पीएसआय लोखंडे, गुल्लानी आणि मेश्राम हे तिघे भाड्याची झायलो कार एमएच ३४/ २६९८ मध्ये बसून रविवारी भल्या सकाळी नागपुरात आले. गुल्लानी आणि मेश्रामने करमचंदानीला घरातून कारजवळ आणले. कारमध्ये मागच्या सीटवर बसून असलेला पीएसआय लोखंडे याने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तातडीने ८५ हजार रुपये मागितले होते.