महिला सरपंच व ग्रामसेवकाला रॉकेल घालून जाळण्याचा प्रयत्न

0
15

गडचिरोली,दि.10 : मुलांना शालेय कामाकरिता रहिवासी दाखला देण्यास टाळाटाळ केल्याच्या रागातून एका इसमाने ग्रामपंचायत कार्यालय गाठून उपस्थित महिला सरपंच आणि ग्रामसेवकावर रॉकेल फेकून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित लोकांनी प्रसंगावधान राखत त्याला अडविल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना कुरखेडापासून ५ किलोमीटरवर असलेल्या चिखली गावात आज मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, चिखली ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या चिचटोला येथील आरोपी अरुण फगवा सिंद्राम (३५) याला त्याच्या मुलाच्या शैक्षणिक कामासाठी ग्रामपंचायकडून रहिवासी दाखला हवा होता. त्याने मागील वर्षापर्यंतच्या कराचा भरणा आधीच केला होता. मात्र चालू वर्षाचा कर भरलेला नसल्याने हा कर भरल्याशिवाय दाखला मिळणार नाही, अशी भूमिका ग्रामपंचायतने घेतली. त्यामुळे तो त्रस्त होता. यातूनच त्याने मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. पुन्हा एकदा दाखल्याची मागणी केली, पण प्रतिसाद मिळत नसल्याने उपस्थित कर्मचाºयांना शिविगाळ करीत काही कागदपत्रे (रेकॉर्ड) उचलून घरी घेऊन गेला. काही वेळातच आरोपी अरुण सिंद्राम ग्रामपंचायतमध्ये पोहोचला. यावेळी त्याने एका प्लास्टिक कॅनमध्ये रॉकेल भरून आणले होते. त्याने ते रॉकेल सरपंच व ग्रामसेवकाच्या अंगावर फेकले आणि आगपेटीच्या काडीने पेटविण्याचा प्रयत्न करीत असताना उपस्थित उपसरपंच, कर्मचारी व गावकºयांनी त्याला पकडले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोचून  त्याला अटक केली.सरपंच तुलसी उईके यांच्या तक्रारीवरून आरोपी सिंद्रामविरूद्ध भादंवि कलम ३०७, ४३८, ५०४, ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. ठाणेदार गजानन पडळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय वनकर तपास करीत आहे.