नाल्यात वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

0
11

गोरेगाव,दि.30 : तालुक्यातील म्हसगाव-कमरगाव नाल्यात एक विद्यार्थी वाहून गेल्याची घटना मंगळवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने नाल्यात शोध मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर बुधवारी (दि.२९) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास म्हसगाववरुन अर्धा कि.मी.अंतरावर विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला. कार्तिक भोजराज रहांगडाले (१४) रा. कमरगाव असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार कार्तिक हा म्हसगाव येथील एस.एस.पी.डी हायस्कूलचा विद्यार्थी असून तो आठव्या वर्गात शिक्षक होता. मंगळवारी शाळा सुटल्यानंतर तो कमरगाव येथे घरी परत जात होता.दरम्यान म्हसगाव-कमरगाव नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने त्याचा तोल गेल्याने तो नाल्यात वाहून गेला. जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडंब भरुन वाहत आहे. नाल्यातील पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो दूर वाहून गेला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी याची माहिती तहसीलदार व पोलीस विभागाला दिली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजतापासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने म्हसगाव-कमरगाव नाल्यात शोध मोहीम सुरू करण्यात आली. रात्री ८ वाजतापर्यंत शोधमोहिम सुरू होती. मात्र अंधार झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर बुधवारी (दि.२९) सकाळी ६ वाजतापासून शोध मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान घटनास्थळपासून अर्धा कि.मी.अंतरावर कार्तिकचा मृतदेह सापडला. शोध पथकाने कार्तिकचा मृतदेह नाल्याबाहेर काढल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.यावेळी नायब तहसीलदार मनोज वाडे, नरेश वेदी उपस्थित होते.