पोलीस अधिक्षकांच्या शेजारील कृषी सभापतीच्या शासकीय निवासस्थानात चोरी

0
20

गोंदिया,दि.०३ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने पतंगा मैदानाच्या मागील भागात पांगोली नदीला लागून असलेल्या शासकीय जागेवर अधिकारी-कर्मचारी यांच्या निवासस्थानाकरीता शासकीय वसाहत तयार करण्यात आलेली आहे.सोबतच या वसाहतीमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापासून सर्वच पदाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलीस अधिक्षक,जिल्हाधिकारी,जिल्हा न्यायाधिश यांचेही निवासस्थान या भागात आहेत.गेल्या काही दिवसापासून जिल्हा परिषदेच्या काही सदनिकामध्ये कर्मचारी व अधिकारी निवास करु लागले आहेत.तर पदाधिकारी यांच्याकरीताही निवासस्थान तयार करण्यात आलेले आहेत.जेव्हापासून हे निवास्थान तयार झाले तेव्हापासून एकही पदाधिकारी या निवासस्थानात कधीही राहायला गेलेला नाही हे विशेष आहे.त्यातच जानेवारी २०१८ मध्ये सत्तेवर आलेल्या पदाधिकाèयांकरिता निवासस्थान सजविण्यात आले,सामान्य प्रशासन विभाग व बांधकाम विभागाच्यावतीने लाखो रुपये खर्च करुन साहित्य या निवासस्थानात देण्यात आल्यानंतरही कुणीही राहत नाही हे वास्तव्य घेरूनच चोरट्यांनी पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानापासून अवघ्या १०० ते १२५ मीटरवर असलेल्या जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती यांच्या निवासस्थानातील साहित्यांची २ नोव्हेंबरच्या दरम्यान चोरी केल्याची घटना आज ३ नोव्हेंबरला उघडकीस आली आहे.चोरट्यांनी या निवासस्थानातून बेडरुमधील फोम गादी,बाथरुम सेट,ग्लास सेट १२नग,कप सेट १२ नग,नास्ता प्लेट १२ नग,ट्रे सेट,फायबर चेयर ६ ,टी टेबल,दरवाजे पडदे,खिडकी पडदे,एलईडी बल्ब तसेच आलमारीफोडून साहित्य लंपास केले आहे.एलईडी बल्पकरीता पीओपीला सुध्दा तोडण्यात आलेले आहे.विशेष म्हणजे या भागात रहदारी असताना आणि अधिकारी,कर्मचारी पोलीस यांचा वावर असताना बाहेरील चोरटा हे साहित्य कसे लंपास करेल अशा प्रश्न निर्माण झालेला असून चर्चेनुसार या परिसरात राहणाèयापैकी तर कुणी नाही ना अशीही शंका निर्माण झाली आहे.तर पोलीस अधिक्षक यांच्या घराशेजारीच हा प्रकार घडल्याने त्यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर तसेच जिल्हा न्यायाधिशांच्या प्रवेशद्वारावर ड्युटीवर असलेल्या पोलीसांनाही त्या निवासस्थानातील हालचालीकडे लक्ष कसे गेले नाही अशा प्रश्न उपस्थित झाला आहे.याप्रकरणात गोंदिया ग्रामीण पोलीसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
विशेष म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी व त्याच्या काही दिवसाअगोदरपासून कुठलेही पदाधिकारी आपल्या निवासस्थानात राहत नसल्याची माहिती समोर आली आहे.जि.प.अध्यक्षांनी तर आपल्या निवासस्थानात आजपर्यंत पाऊलच ठेवले नसल्याचे समोर आले आहे.पदाधिकारी आजही शासकीय वाहनानेच आपल्या गावावरुन ये जा करीत असल्याचे बोलले जात असून यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वाळके यांच्याशी माहिती घेण्याकरीता संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी बंद ठेवल्याने संपर्क होऊ शकला नाही.