लाच घेतल्याप्रकरणी पोलिस शिपायासह इतर एकास अटक

0
12
गोंदिया,दि.३० : चोरीच्या गुन्ह्यातून नाव वगळून मुक्त केल्याप्रकरणी त्या व्यक्तीकडून तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून इतर व्यक्तीने ती लाच स्विकारली. ही घटना आज(दि.३०) आमगाव तालुक्यातील मानेगाव येथे घडली. पोलिस शिपायाचे नाव भूमेश्वर देबिलाल येरणे आणि नितीन ईश्वरदास तिरपुडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सविस्तर असे की, दोन महिन्यांपूर्वी आमगाव तालुक्यातील दहेगाव येथील शेतातून विद्युत मोटारपंप चोरीला गेले होते. दरम्यान पोलिस शिपायी भूमेश्वर येरणे यांनी दोघांना संशयावरून विचारपूस करण्याकरिता पोलिस ठाण्यात बोलावून सोडून दिले. मात्र तूला सोडून दिले त्यामुळे तीन हजार रुपये दे म्हणून तक्रारदाराकडे तगादा लावला. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २८ जानेवारी रोजी गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. विभागाने शहानिशा करून आज(ता.३०) सापळा रचला. दरम्यान पोलिस शिपाई भूमेश्वर येरणे याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून अटक न करण्याकरिता तीन हजार रुपयांची मागणी केली. ती रक्कम मानेगाव येथील ईश्वरदास तिरपुडे(वय२४) याच्यामार्फत स्विकारली. दोन्ही आरोपींविरोधात आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, राजेश शेंद्रे, रंजित बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, देवानंद मारबते यांनी केली.