देशीकट्टा, काडतुसांसह वाहनचोर अटकेत

0
20

भंडारा,दि.10ःः भंडार्‍यातून चोरीला गेलेल्या वाहनाचा शोध घेत असताना वाहनचोराच्या घर झडतीत देशीकट्टा, सहा काडतुस सापडली. ही कारवाई भंडारा पोलिसांनी नागपूर शहरातील जरीपटका भागात केली. सरदुलसिंग उर्फ बलविंदरसिंग बलदेवसिंग सिंधू रा. कांगडा हिमाचल प्रदेश, ह.मु. जरीपटका नागपूर असे अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे.
२५ जानेवारी रोजी भंडारा येथील बालाजी पेट्रोलपंपासमोरुन महिंद्रा पिक अप मॅक्स गाडी क्रमांक एमएच ४0 एन ३५९0 चोरीला गेली होती. भंडारा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. सीसीटीव्ही पाहणीमध्ये महिंद्रा मॅक्स गाडी चोरताना त्या गाडीच्या शेजारी टाटा आयशर ट्रकही जाताना दिसला. हे दोन्ही वाहने रामटेक रोडने नागपूर शहरात पोहोचले. दरम्यान, जरीपटका येथे महिंद्रा पिक अप गाडी संशयास्पद असल्याने एकाने त्यावरील मोबाईल क्र मांकावरून गाडी मालक गुणवंत तिडके यांच्याशी संपर्ककेला.
तिडके यांनी भंडारा पोलिसांना कळविताच पोलिसांनी जरीपटका भागात नजर ठेवली. त्यावेळी आरोपी सरदुलसिंग हा पोलिसांना पाहून पळून जाताना त्याला पकडण्यात आले. त्याच्या घरझडतीमध्ये पोलिसांना एक देशी कट्टा व सहा जिवंत काडतूस सापडली. त्यामुळे ही मोठी टोळी असल्याचे दिसून येते. पोलिसांनी महिंद्रा मॅक्स व टाटा आयशर ट्रक जप्त केला आहे. याप्रकरणात आणखी एक आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमरदिप खाडे, हवालदार बापुराव भूसावळे, पुरुषोत्तम शेंडे, किर्ती तिवारी, अजय कुकडे, बेनाथ बुरडे, संदीप बन्सोड, कृष्णा कातकडे यांनी केली.