गोंदिया – बल्लारशाह रेल्वेगाडीने दारूची तस्करी

0
18

गोंदिया,दि.10 : गडचिरोलीनंतर चंद्रपूर जिल्ह्यातही काही वर्षांपूर्वी दारूबंदी करण्यात आली. या दोन्ही जिल्ह्यात दारूबंदी असली, तरी गोंदियातून मोठय़ा प्रमाणात दारूची तस्करी केली जात आहे. विशेष म्हणजे, गोंदियावरून बल्लारशाह जाणार्‍या रेल्वेगाडीने अवैधरित्या आरोपी देशी, विदेशी दारू नेत असल्याची चर्चा होती. दरम्यान (दि.७) रेल्वे पोलिसांनी दोन आरोपींना विदेशी दारू नेताना रंगेहात पकडले. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. या संधीचा लाभ घेत अवैध व्यवसायिकांनी लगतच्या मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड राज्यातून अवैधरित्या गडचिरोली व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यात अवैध दारूपुरवठा सुरू केला. अनेक वेळा गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर कारवाईचे सत्रही अवलंबविण्यात आले. त्यातच आता गोंदिया येथील दारू विक्रेत्याकडून आरोपी ती दारू अवैधरित्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात नेत आहेत. गोंदियावरून गडचिरोली व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यात जाण्यासाठी गोंदिया – बल्लारशाह ही रेल्वे सोयीस्कर आहे. सिंगल ट्रॅक रेल्वे लाईन असल्याने व त्यातही ही एकच गाडी असल्याने याचा लाभ अवैध
दारू विक्रेते मोठ्या प्रमाणात घेत आहेत. (दि.७) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकावरील फलाट क्र.१ वर दोन युवक बॅग घेवून संशयास्पद हालचाली करताना आढळले. त्या युवकांची रेल्वे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी आपले नाव देवानंद बापूराव गोरे (३१) रा. दुर्गा चौक, चंद्रपूर व दुर्गेश ओमप्रकाश शर्मा (२0) रा. दुर्गा चौक, चंद्रपूर असे सांगितले. त्यांच्याकडून विदेशी दारूच्या ९६ बॉटल (किंमत १४ हजार ४00 रुपये) जप्त करण्यात आल्या. दोघांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रेल्वे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे, सहायक सुरक्षा आयुक्त ए.के. स्वामी यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक एस. दत्ता, उपनिरीक्षक एस.एस. बघेल, प्रधान आरक्षक आर.सी. कटरे, आरक्षक एस.बी. मेर्शाम, उपनिरीक्षक विमेक मेर्शाम, पी.एल. पटेल, प्रधान आरक्षक राहुल सिंग, नासिर खान, नंदा माने आदींनी केली.