सरपंच-उपसरपंचात हाणामारी

0
17

अमरावती,दि.26 : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर ठेवल्याचा वाद सोमवारी वलगाव ग्रामपंचायत येथील आमसभेत उफाळून आला. यात महिला सरपंच व उपसरपंचात हाणामारी होऊन कार्यालयात तोडफोड झाल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणात वलगाव पोलिसांनी उपसरंपचाविरुद्ध गुन्हा नोंदवून, त्यांना अटक केली.वलगाव येथील सेवानिवृत्त कर्मचारीच्या निवडीवरून ग्रामपंचायतीत सरपंच मोहिनी विठ्ठल मोहोड (४०) व उपसरपंच महेश गुलाबराव उकटे (४७) यांच्यात सोमवारी आमसभेत हाणामारी झाली. सोमवारी सकाळी ११ वाजता आमसभेत विविध विषयावर चर्चा सुरू असताना सरपंच मोहिनी मोहोड यांनी कृष्णराव तायडे यांच्या नियुक्तीचा मुद्दा मांडला. तायडे हे ग्रामपंचायत येथे वीज कर्मचारी पदावर कार्यरत होते. परंतु ते काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाल्याने गावातील पथदिव्याचे काम रखडले होते. त्यामुळे सरपंच मोहिनी मोहोड यांनी तायडे यांची रोजंदारीवर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. परंतु उपसरपंच उकटे यांनी तायडेच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. त्यामुळे मोहोड व उकटे यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीतही झाले. शिवीगाळ आणि भांडणाने ग्रामपंचायत कार्यालय दणाणून गेले होते. याप्रकरणी सरपंच मोहीम मोहोड यांनी तत्काळ वलगाव पोलीस ठाणे गाठून उपसरपंचांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी उपसरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, ग्रामपंचायतीत झालेल्या या हाणामारीच्या घटनेमुळे वलगावातील वातावरण तापले होते.