शिवसेना भाजपा युती का व कशासाठी

0
61
“तुम्ही मला वचन देत असाल तर आज मी निर्णय घेतोय, आता याच्या पुढे भविष्यात शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकवेल, आता यापुढे मी युतीसाठी कुणाच्याही दारात कटोरा घेऊन जाणार नाही. जे काही असेल ते माझ्या भगव्याचं, माझ्या शिवसेनाप्रमुखांचं माझ्या शिवसैनिकांचं असेल. महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आता भविष्यात कुठेही युती करणार नाही. आता या पुढे लढाई सुरू झालेली आहे. मला आता एकच ध्यास आहे, ही संधी आहे, करीन तर आत्ताच आणि ते मी केल्या शिवाय राहणार नाही. गेली 25 वर्ष युती सडली” अशा घणाघाती शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी गेल्या २५ वर्षांचा घरोबा संपुष्टात आणण्याची घोषणा प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०१७ रोजी शिवसेनेचे पदाधिकारी, विभागप्रमुख, गटप्रमुखांच्या मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित मेळाव्यात केली.
त्यापूर्वी एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे संपूर्ण बहुमत मिळाल्यामुळे व केंद्रातील पुढील ५ वर्षे सत्ता चालविण्यासाठी इतर कोणत्याही मित्र पक्षांची मदत घेण्याची आवश्यकता लागणार नसल्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला होता व त्यामुळे भाजपाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यापुढील  निवडणुकीत कोणत्याही इतर पक्षासोबत युती नको ह्याच विचाराने चालत होते त्यामुळे सप्टेंबर २०१४ रोजी विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेला युतीच्या चर्चेत अडकवून ठेवून व पूर्णतः गाफील ठेवून अखेरच्या क्षणी त्यावेळचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपाचे जेष्ठ नेते श्री एकनाथ खडसे ह्यांच्यामार्फत युती तोडण्याची घोषणा भाजपातर्फे करण्यात आली. २५ वर्षापासूनचा जुना मित्र सोबत असणार व त्यांच्यासोबत ह्यावेळी देखील युती होईल ह्या विचाराने शिवसेना नेतृत्व थोडे बेसावध होते परंतु विधानसभेच्या पाच जागांवरून दोन्ही पक्षांतील युती तुटल्याचे तेव्हा सांगण्यात आले. आताचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे तेव्हा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. शिवसेनेशी युती तोडण्याची घोषणा तशी महत्त्वाची होती व ती जबाबदारी श्री एकनाथ खडसे ह्यानी स्वतःच्या खांद्यावर घेवून शिवसेनेच्या नेतृत्वाशी एक प्रकारे वैर ओढवून घेतले होते.
२०१४ साली लोकसभा व नंतर विधानसभेत एकहाती सत्ता आल्यामुळे भाजपा नेतृत्त्व तेव्हा हवेत होते त्यामुळे संधी मिळेल तिथे त्यांनी शिवसेनेला डावलायला सुरवात केली. सत्तेत वाटा देखील हवा तसा न देता कमी महत्वाची खाती देण्यात आली. तसेच अधिक मंत्रिपदाची मागणी असूनही कमीच खाती देण्यात आली. आपल्याला डावलले जात आहे व भाजपा नेतृत्वाकडून आपली किंमत केली जात नाही आहे हे चाणाक्ष शिवसेना नेतृत्वाच्या लक्षात यायला सुरुवात झाली व भाजपाच्या मताप्रमाणे व सांगेल तसेच ऐकण्याऐवजी त्यांच्यामागे फरफटत न जाता आपली वेगळी रणनीती आखायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी सुरुवात केली. मुंबई महानगर निवडणुकीनंतर वर्षभराने म्हणजेच जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळावर निवडणुका लढवण्याचा ठराव केल्यानंतर गेल्या वर्षभरापासून शिवसेना आणि पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे हे सातत्याने भाजपवर, त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सातत्याने टीका करत होते. मात्र, या सर्व भूमिका गुंडाळून ठेवत उद्धव ठाकरे युतीला राजी झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरे आणि शहा यांनी वरळी येथील पत्रकार परिषदेत युतीची घोषणा
केली.
मात्र सोमवारी १८ फेब्रुवारी २०१९रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्यात झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना भाजपा युती करण्याची घोषणा करण्यात आली. ह्यानिमित्ताने लोकसभेसाठी भाजपा २५ तर शिवसेना २३ जागा लढवेल आणि विधानसभेसाठी मित्रपक्षांच्या जागा सोडून उरलेल्या जागांचे समसमान वाटप, या तत्त्वावर युती झाल्याचे जाहीर करण्यात आले.
परस्परांवर टोकाची टीका आणि स्वबळावर लढण्याची भीमगर्जना करूनही तसेच ‘पहारेकरी चोर आहे’ अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केल्यानंतर आणि अगदी कालपरवापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारवर विखारी टीका करून स्वबळाचा नारा दिल्यानंतर मध्यंतरी उभयतांमधील संबंध काहीसे ताणले गेले होते अखेर हिंदुत्व, राम मंदिर आणि अविचारी लोकांच्या आघाडीला पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखण्याचे कारण देत शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतिसाठी राजी झाले. लोकसभा युतीसाठी भाजपने एक पाऊल मागे घेतले असले आणि उद्धव ठाकरे यांनी मन मोठे केल्याने आता कटुता संपली तरी शिवसेनेला मोठय़ा भावाचा मान मात्र दिलेला नाही. लोकसभेसाठी गेल्या वेळीपेक्षा शिवसेनेला एक जागा जास्त सोडण्यात आली.
युतीची घोषणा झाल्यानंतर सोशियल मिडियावर बऱ्याच चित्रविचित्र प्रतिक्रिया आल्या. शिवसेना व शिवसेना नेतृत्वाला टोचणार्या प्रतिक्रिया विरोधकांनी जाणूनबुजून टाकल्या. टी वी चेनेल वर देखील विरोधी पक्षाचे प्रवक्ते युती करण्यापूर्वी शिवसेनेने स्वतःच केलेल्या विधानांची आठवण करून देवू लागले व शिवसेना नेतृत्व, संजय राऊत ह्यांनी पूर्वी केलेली विधाने मुद्दाम पुन्हा पुन्हा मांडून शिवसेना त्यांच्या विधानांवर व तत्वांवर कशी पलटी मारते ह्याची जाहीर उजळणी करू लागले जेणेकरून शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते ह्यांच्या मनात आपले नेतृत्व चुकले की काय अशी शंका  उत्पन्न करण्याचे कार्य विरोधी पक्ष व त्यांचे कार्यकर्ते करू लागले. हे पद्धतशीर राजकारण खेळून जनता व मतदारांच्या मनात देखील शिवसेनेविरोधात संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधक करत होते. दुसऱ्याबाजूला फ़ेसबुक व व्हाट्सअप वर काही शिवसेनेचे हितचिंतक व अभ्यासू शिवसैनिक, इतर शिवसैनिकांना व इतरांना शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे ह्यानी घेतलेला युतीचा निर्णय किती योग्य आहे हे पटवून देत होते.
शिवसेना भाजपा युती होवू नये ह्यासाठी दोन्ही मुख्य विरोधी पक्ष आपापल्या परीने कसोशीने प्रयत्न करत होते. सत्तेत राहून भाजपानेतृत्व व कारभारावर आखूड ओढून प्रसंगी सार्वजनिकपणे आमच्या मंत्राचे राजीनामे तयार आहे असे सांगून विरोधी पक्षाचे कार्य देखील शिवसेना करत होती. शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी, नाणार प्रकल्प, हिंदुत्ववाद, राममंदिर, नोटाबंदी इत्यादी अनेक विषयांवर शिवसेना  संसदेत, विधानभवनमध्ये तसेच बाहेर रस्त्यावर देखील सत्तेत राहून विरोधी पक्षाप्रमाणे आवाज उठवित होती, आंदोलने छेडत होती. मुळात विरोधी पक्ष येथे कमी पडले, ते शिवसेनेच्या नेतृत्वाला कमी लेखू लागले व शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनामा तयार आहेत ह्या विधानांची खिल्ली उडवीत राहिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस कित्येक वर्षे सत्तेत होते त्यामुळे आता त्यांना सत्तेशिवाय राहाणे जमत नव्हते. शिवसेना भाजपा मध्ये बेबनाव कसा वाढेल ह्यासाठी विरोधक एकही संधी सोडत नव्हते व त्यामुळेच शिवसेना सत्तेबाहेर पडावी व आपण भाजपाला पाठिंबा द्यावा ह्यासाठी गेल्या साडेचार वर्षापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेला डिवचुन, कधी एकदा शिवसेना सत्तेतून बाहेर पडते ह्याची वाट पाहत बसली होती. छुप्यापद्धतीने कॉंग्रेसदेखील त्यांना पाठबळ देत होते परंतु शिवसेनेचे चाणाक्ष नेतृत्व हे सर्व ओळखून होते.  शिवसेनेला जाणीव होती की एकदा का सत्तेतून बाहेर पडले की राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकार मध्ये लगेच सामील होईल व त्याचबरोबर शिवसेनेचे काही आमदार देखील सत्तेची मलई खाण्यासाठी, आपल्या विधानसभेचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी व नवीन प्रकल्प आपल्या मतदारसंघात आणण्यासाठी पक्ष सोडून जातील ही जाणीव पक्षनेतृत्वाला आली होती
 सध्याचे शिवसेनेचे कार्य, संघटना बांधणी, गावागावात शिवसेना करत असलेली कार्ये व विरोधाला विरोध न करता जेथे जेथे चुकत असेल तेथे तेथे भाजपाला विरोध करून व प्रसंगी त्याविरुद्ध आवाज उठवून शिवसेनेने आपली प्रतिमा उजळ बनविली आहे व त्यामुळेच भाजपासोबत युती करून शिवसेनेने लोकसभेत कमीतकमी २० जागा व विधानसभा निवडणुकीत सत्ता काबीज करून मुख्यमंत्रीपदी आपला माणूस बसवायची संधी शिवसैनिकांच्या सहाय्याने उद्धव ठाकरेंच्या कुशल नेतृत्वातून निर्माण केली आहे आणि विरोधकांना देखील हे जाणवले आहे.
एकहाती सत्ता आणणे हे आता कोणात्याही पक्षाला शक्य नव्हते. आपले खरे मित्र आणि आपले खरे शत्रू कोण हे दोन्ही पक्ष ओळखून होते. पाच राज्यातील विधानसभा निवडणूक व ओसरलेली मोदी लाट ह्याची जाणीव भाजपा नेतृत्वाला होती तसेच शिवसेनेशिवाय इतर कोणताही पक्ष आपला खरा साथीदार होवू शकत नाही हेदेखील भाजप नेतृत्व ओळखून होता त्यामुळेच दोघांनाही एकत्र येण्यावाचून पर्याय नव्हता. तसेच युती केल्यामुळे सत्तेत आल्यानंतर कार्यकर्त्यांना देखील संरक्षण मिळणार, मंत्रीपदे, शासकीय समिती व इतर चांगल्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावता येईल व सत्तेचे मिळणारे इतर लाभ कार्यकर्त्यांना आपसूकच मिळावेत ह्या उद्देशाने युती केल्याचा फायदाच होणार आहे. युती नसती तर कदाचित दोघांचेही उमेदवार निवडून येणे कठीणच झाले असते व ही जाणीव युतीच्या खासदार-आमदार यांना देखील झाली होती परंतु आता युती झाल्याने जिंकायचा मार्ग सुकर झाला आहे व आत्मविश्वास देखील वाढला असणार. शिवसेनेसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांच्या नेतृत्वाने अतिशय मुत्सद्देगिरी दाखवून भाजपाला नमवून आपल्या सर्व अटी मान्य करून घेतल्या. शिवसेना भाजपा युतीने खरेतर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाचे खूपच मोठे नुकसान होणार आहे.
लेखक : श्री शेखर चंद्रकांत भोसले, टाटा कॉलनी, मुलुंड पूर्व.
9833592953