नवचेतना मिशन शिक्षण क्षेत्रासाठी आदर्श

0
21

चंद्रपूर दि. २९: शिक्षण हे माणसाचे व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी असते. नवचेतना मिशन प्रगतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असून जिल्हा परिषदेने सुरु केलेले नवचेतना मिशन राज्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

नवचेतना मिशनच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, शिक्षण सभापती देवराव भोंगळे, सरिता कुडे, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, डॉ. विजय देवतळे, विजय वानखेडे, शांताराम चौखे, शिक्षणाधिकारी संजय डोर्लिकर यावेळी उपस्थित होते.यावेळी नवचेतना मिशनचा लोगो, घडीपत्रिका व संकेतस्थळाचे लोकार्पण पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयावर मिशनचा फोकस असणार आहे. यासाठी शिक्षकांची थिंक टँक तयार करण्यात आली असून मराठी, इंग्रजी व गणित विषय ब्रिगेड तयार करण्यात आल्याचे सांगितले. जिल्ह्यात १५७१ शाळांमध्ये एक लाखांच्यावर विद्यार्थी आहेत. त्यांना गुणात्मक शिक्षण देण्यासाठी हे मिशन कार्य करणार आहे. या मिशन मध्ये विद्यार्थी व शिक्षकांना नवरत्न पुरस्कार देण्यात येणार आहेत. नवचेतना मिशनचा गुणवत्ता दर्शक आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी असून दोन वर्षांनंतर या कार्यक्रमाचे मूल्याकंन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.