भंडारा दि.५: जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने शनिवारला जिल्ह्यातील १४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात यावर्षीच्या पुरस्कारासाठी पाच शिक्षकांची तर मागील वर्षीच्या नऊ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. यात विद्यार्थी घडविताना नावीन्यपूर्ण कार्य करणार्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सत्कार करण्यात येतो. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त समितीकडे शिक्षकांचे प्रस्ताव येतात. यातील योग्य प्रस्तावक शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यासाळी निवड केली आहे. निवड करण्यात आलेल्या शिक्षकांना उद्या शनिवारला जिल्हा परिषदच्या सभागृहात होणार्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यo्री गिलोरकर, उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती राजेश डोंगरे सर्वविभागाचे सभापती, मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर, शिक्षणाधिकारी किसन शेंडे यांची उपस्थिती राहणार आहे.
मागील शैक्षणिक सत्र सन २0१४-१५ मध्ये जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार देण्यात आला नव्हता. त्यामुळे मागील वर्षीच्या निवड झालेल्या शिक्षकांना यावर्षीच्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. मागील वर्षीसाठी नऊ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली असून यावर्षीसाठी पाच शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये प्राथमिक, माध्यमिक व विशेष प्रवर्गातील शिक्षकांचा समावेश आहे.
सन २0१५-१६ मधील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक प्राथमिक विभागात रशेषकुमार आत्माराम फाटे (डोंगरगाव), उमाजी हरिश्चंद्र देशमुख (भेंडाळा), नागसेन प्रेमदास फुले (वडेगाव), अत्ताउल्ला खान अजीज खान पठाण (शिवनीबांध), माध्यमिक विभागातील यादवराव रामजी गायकवाड (पिंपळगाव/ सडक) यांचा समावेश आहे.
सत्र २0१४-१५ साठी प्राथमिक विभागात संतोष बिसन कारेमोरे (सिर्सी), योगेश गोवर्धन पुडके (डोंगरगाव), गुलाब सदाशिव अव्हाड (बाम्हणी), श्रीधर भागवत कांकीरवार (रेंगेपार/कोठा), विनोद शंकर भोवते (लवारी), हरिदास पुरूषोत्तम धावडे (शेंद्री/खुर्द), माध्यमिक विभागातील छाया शिवशंकर देशकर (लाल बहादूर शास्त्री विद्यालय, भंडारा), मधुकर राजाराम तुरकाने (मुरमाडी), तर विशेष शिक्षक म्हणून महादेव रामाजी साठोणे (जकातदार विद्यालय, भंडारा) यांचा समावेश आहे.