बारावीची पुरवणी परीक्षा २९ पासून

0
13

नागपूर दि.२४:- बारावीची पुरवणी परीक्षा येत्या २९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, नागपूर विभागातून आठ हजार सहाशे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तसेच केंद्रीय पद्धतीने मूल्यांकन होणार असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा होतात. आतापर्यंत सप्टेंबरच्या अखेरीस या परीक्षांना सुरुवात होत असे. परंतु, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी दहावीची पुरवणी परीक्षा जुलै महिन्यात झाली आणि निकालही जाहीर झाले. आता २९ सप्टेंबरपासून बारावीच्या पुरवणी परीक्षेला सुरुवात होत आहे. यंदा झालेल्या वेळापत्रकातील बदल लक्षात घेता पुरवणी परीक्षेतील उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय नागपूर विभागीय मंडळाने घेतला आहे. याची सुरुवात बारावीच्या पुरवणी परीक्षेपासून होत आहे. २९ सप्टेंबर ते २१ ऑक्‍टोबरपर्यंत विभागातील एकूण ५५ केंद्रांवर पुरवणी परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकारची तयारी झाल्याची माहिती नागपूर विभागाच्या वतीने देण्यात आली. विशेष म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणारी बारावीची परीक्षा २०१६ मध्ये फेब्रुवारीच्या तिसऱ्याच आठवड्यात सुरू होणार असल्याचीही माहिती दिली.