मनरो शाळेसंबधीचे विद्यार्थ्यांचे निवेदन सीईओंनी फेटाळले….

0
119

भंडारा,दि.14ः येथील मनरो(लाल बहादुर शास्त्री) शाळेतील सुरू असलेले व्यापारी गाळे बांधकाम थांबविण्यात यावे या मागणीसाठी आज शाळेच्या विद्यार्थ्यांनी गणवेश घालून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र सीईओंनी ते निवेदन न स्विकारता फेटाळल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.
शाळेच्या पटांगणात सुरू असलेले काम थांबविण्यासाठी मागील महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या पद्धतीने सुरू असलेल्या आंदोलनात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. विविध संघटनाही पुढे येत शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत. मनसेच्या वतीने दोन दिवसांपूर्वी थाळी बजाव आंदोलन करण्यात आले होते. सुरू असलेल्या या आंदोलनात रोज विविध लोक सहभागी होत आहेत. शाळेचे माजी विद्यार्थी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आज या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जिल्हा परिषद गाठली. गाडीतून उतरत असलेल्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी ते स्वीकारले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड होऊन निराश होत ते परतले. शाळेचे पटांगण वाचविण्यासाठी महिनाभरापासून आंदोलन सुरू असताना मुख्य कार्यपालन अधिकारी यांची विद्यार्थ्यांनी प्रतीची ही अनास्था अधिकाऱ्यांच्या निगरगट्टपणा चा परिचय देऊन जाते.