यश गाठण्यासाठी ध्येय निश्‍चित करा

0
44

बोंडगावदेवी : आजच्या महाविद्यालयीन युवकांनी ध्येयवादी रहावे. महाविद्यालयात पदार्पण केल्यानंतर जीवनाच्या खर्‍या आयुष्याचा प्रारंभ होतो. सकारात्मक विचारांना अंगिकारून युवकांनी प्रगतीच्या वाटा शोधण्यास प्राधान्य द्यावे. आजचा युवक उद्याचा भाग्यविधाता, समाजाचा शिल्पकार ठरेल. त्यामुळे आजच विद्यार्थ्यांनी आपले उच्चप्रतीचे ध्येय निश्‍चित करून प्रगतीच्या वाटा शोधण्यास प्रथम प्राधान्य द्यावे, असा हितोपदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिला.
येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर तसेच अर्जुनी-मोरगाव येथील शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान या संकल्पनेवर आधारित विद्यापीठस्तरिय सात दिवशीय रासेयो शिबिराचे १५ जानेवारीपर्यंत आयोजन केले आहे. शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठस्तरिय राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ नागपूर अंतर्गत येत असलेल्या चारजिल्ह्याच्या ३0 महाविद्यालयातील २00विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्याचे दायित्व युवकांना मिळते. आई-वडील तसेच समाजाप्रती आपली काही जबाबदारी आहे, याचे भान ठेवून युवक वर्गाने ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहिल्यास, निश्‍चितच संकटांवर मात करणे सहज शक्य आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी निरंतन प्रयत्न, जिज्ञासा आत्मसात कल्यास प्रगतीचे शिखर गाठायला वेळलागणार नाही, असे ते म्हणाले.
उद््घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी दुर्गा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लुनकरण चितलंगे होते. अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रचना गहाणे, माजी आ. दयाराम कापगते, संस्था सचिव मुकेश जायस्वाल, स्थानिक सरपंच राधेश्याम झोळे, नामदेव कापगते, सुदाम डोंगरवार, यशवंत लंजे, तालुका भाजपा अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, बद्रीप्रसाद जायस्वाल, प्राचार्य डॉ. संजीव पाटणकर उपस्थित होते. ‘या भारतात बंधु भाव नित्य वसुदे, देवरची अशा दे’ या विद्यापीठ गीताने उद््घाटनीय कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने ना. बडोले, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांचा संस्थाध्यक्ष लुनकरण चितलंगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व ग्रामगीता भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. दिलीप काकडे यांनी केले. प्रास्ताविक शिबिर संयोजक प्रा.शरद मेश्राम यांनी मांडले. आभार डॉ. राजेश चांडक यांनी मानले