विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग व्हावा- मुख्यमंत्री फडणवीस

0
5

गडचिरोली,दि..२५: विद्यापीठे निव्वळ पदवी प्रदान करणारे कारखाने होऊ नयेत, तर त्यातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग व्हावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केली.

गोंडवाना विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर, तर विशेष अतिथी म्हणून राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम उपस्थित होते. गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विनायक इरपाते यांच्यासह विविध शाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, गोंडवनाची संस्कृती ही समृद्ध संस्कृतीचा अविष्कार आहे. याच संस्कृतीने येथील जल, जंगल व जमीन वाचवून निसर्गाचं संवर्धन केलं. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठ हे  विकासाचा समृद्ध वारसा सांगणारे विद्यापीठ व्हावे. ज्या देशांनी मानवसंसाधनात स्त्रियांना महत्व देऊन विकासप्रक्रियेत सहभागी करुन घेतलं, ते देश विकसित झाले, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आता केवळ ज्ञान असणारा मनुष्य ज्ञानी समजला जातो. परंतु पुढच्या शतकात कल्पकता असणाऱ्या मनुष्यास ज्ञानी समजले जाईल. त्यामुळे ज्ञानाचा उपयोग कल्पकता वापरुन नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी होणे गरजेचे आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या उभारणीत आपला सिंहाचा वाटा असल्याचे सांगून श्री.मुनगंटीवार यांनी या विद्यापीठासाठी २० हेक्टर जागेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला असून, येत्या दोन महिन्यांत त्यास मंजुरी मिळणार असल्याचे सांगितले. जगातील नावाजलेल्या दोनशे विद्यापीठांमध्ये नाव येईल, असे काम गोंडवाना विद्यापीठाने करावे, असे आवाहनही श्री.मुनगंटीवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर व प्रा.डॉ.ईश्वर मोहुर्ले यांनी केले.