गोंदिया,भंडारासह 12 शासकीय नर्सींग स्कुल सुरु होणार

0
6
गोंदिया,दि.25 – केंद्र शासनाच्या अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत आरोग्य सेवेतील मनुष्यबळ वाढविण्याच्या अनुषंगाने देशभरात परिचर्या सेवेच्या बळकटीकरणासाठी देशात १३७ जनरल नर्सिंग स्कूल तसेच १३२ एएनएम स्कूल नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात आठ जिल्ह्यांमध्ये सामान्य नर्सिंग सुरू करण्यात येणार आहेत. यात गडचिरोली, वाशीम, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये जीएनएम सुरू करण्यात येतील. सध्या राज्यात १२ शासकीय आणि साडेचारशेपेक्षा अधिक खासगी जनरल नर्सिंग अभ्यासक्रम सुरू आहेत.

जनरल नर्सिंग स्कूलसाठी ८५ टक्के निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध होणार आहे. तर १५ टक्के निधी राज्य शासनाचा असणार आहे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या जनरल नर्सिंग स्कूलसाठी ४२ कोटी ५३ लाख इतका निधी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सादर केला आहे. तसा अध्यादेश १६ फेब्रुवारी २०१६ रोजी राज्य शासनाने काढला. सिंधुदुर्ग, वाशीम, पुसद येथे प्रत्येकी एक एएनएम आणि गडचिरोली, भंडारा, वाशीम व अमरावती येथे प्रत्येकी एक जीएनएम सुरू करण्यास प्राथमिक स्तरावर मान्यता दिली आहे. तसेच केंद्र शासनाने गोंदिया येथे जीएनएम सुरू करण्यासाठी स्वतंत्ररीत्या मान्यता दिली असल्याचेही अध्यादेशात नमूद आहे.