एनसीसी विद्यार्थ्यांची नागरीकांमध्ये जनजागृती

0
9

सलाम मुंबई फाऊंडेशन, उपप्रादेशिक परिवहन विभागा व बाकलीवाल विद्यालयाचा उपक्रम

वाशिम –नागरीकांनी सर्व नियमांचे पालन करुन धुंदीत नव्हे तर शुध्दीत राहून नववर्ष २०२३ चे स्वागत करा असा बहूमोल संदेश नागरीकांना देण्यासाठी शुक्रवार, ३० डिसेंबर रोजी सलाम मुंबई फाऊंडेशन, उपप्रादेशिक परिवहन विभाग व श्री बाकलीवाल विद्यालयाच्या आयोजनातून तसेच एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या मार्गदर्शनात एनसीसी सैनिकांनी शहरात ठिकठिकाणी सेल्फी पाँईट, पोस्टर व घोषवाक्याच्या माध्यमातून जनजागृती अभियान व रॅली काढली.
या अभियानाचा प्रारंभ श्री बाकलीवाल शाळेतून करण्यात आला. पाटणी चौक, कामगार नाका, रामकृष्ण राठी मार्ग या मार्गाने जनजागृती करत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याला हारार्पण करुन रॅलीचा समारोप करण्यात आला. मार्गात ठिकठिकाणी नका खाऊ गुटखा, नका पिऊ बियर, हैप्पी न्यू ईयर, हैप्पी न्यू ईयर असे घोषवाक्य तसेच पोस्टर व सेल्फी पाँईटच्या माध्यमातून लोकांना वाहतुक नियम समजावून सांगण्यात आले. यावेळी बोलतांना अमोल काळे म्हणाले की, समाजामध्ये वाढत चाललेले व्यसनधीनता खूपच भयानक रूप धारण करीत असून यामध्ये प्रामुख्याने युवकांचे प्रमाण खूपच जास्त आहे. उद्याच्या पिढीला आरोग्यसंपन्न, सुदृढ व व्यसनमुक्त ठेवून भारताला शक्तिशाली राष्ट्र घडविण्याचे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. नवीन वर्षाची सुरुवात आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण आनंदाने उत्साहाने आणि नवीन वर्षाचा संकल्प ठेवून करीत असतो. परंतु ३१ डिसेंबर च्या रात्री अनेक तरुण बेभान होऊन वाहने चालवितात. व स्वतःच्या सुंदर जिवनाला काळीमा फासतात. इतकेच नव्हे तर अती व्यसनामुळे त्यांचा वर्षाचा अखेरचा दिवस अखेरचा ठरतो. तसेच ते आपल्या चुकीमुळे इतरांचे जीवन संपवतात. या उद्देशातून जनतेत व्यापक जनजागृतीचा संकल्प घेवून एनसीसी विद्यार्थ्यांनी रॅलीचे आयोजन केले असून नागरीकांनी नववर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे तर शुध्दीत राहून साजरे करावे असे आवाहन काळे यांनी शेवटी केले.
या अभियानात ७५ एनसीसी सैनिकांनी सहभाग नोंदविला. हया सर्व विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतूक केले.