स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला विद्यार्थी संवाद कार्यक्रम मार्गदर्शन सत्रास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

0
9

गोंदिया, दि.: 5 : केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत नोकर भरतीच्या अनुषंगाने जाहिराती प्रकाशित करण्यात येतात. गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल भागात मोडत असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध विभागाच्या नोकरभरतीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने विस्तृत माहिती नसते, त्याकरीता विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती, विविध विभागाच्या पदांच्या अनुषंगाने परीक्षेची तयारी कशी करावी, त्याकरीता आवश्यक बाबी विषयी तज्ञ वक्त्यांमार्फत मार्गदर्शन करणे व विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरीता जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन २०१८-१९ या वर्षापासून नाविण्यपुर्ण उपक्रम “शोध क्षमतेचा, ग्रामीण ऊर्जेचा” ही स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला सुरु करण्यात आलेली आहे.

         सदर व्याख्यानमाले अंतर्गत प्रत्येक महिन्यात दर शुक्रवारला तज्ञ वक्ते व अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येते. त्यानुसार सामाजिक न्याय विभाग व स्टुडंट्स राईट्स फाऊंडेशन, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने सदर व्याख्यानमालेच्या १४ व्या सत्राचे आयोजन ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे करण्यात आलेले होते. सदर व्याख्यानमालेकरीता दयानंद मेश्राम, माजी सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई व उमेश कोराम, अध्यक्ष, स्टुडंट्स राईट्स फाऊंडेशन, नागपूर हे प्रमुख मार्गदर्शक होते. उमेश कटरे, परेश दुरुगवार सामाजिक कार्यकर्ते हे उपस्थित होते.

         सदर प्रसंगी मार्गदर्शक वक्त्यांनी दयानंद मेश्राम, माजी सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई व उमेश कोरांम, अध्यक्ष, स्टुडंट्स राईट्स फाऊंडेशन, नागपूर यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना संबंधित परीक्षेचे अभ्यासक्रम, प्रश्नांचे स्वरूप, त्याकरीता आवश्यक संदर्भिय क्रमिक पुस्तके इत्यादींचे अवलोकन वाचन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. चालु घडामोडीबाबत दैनिक वर्तमानपत्रे, मासिके व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिकांचा वापर करण्याबाबत व्याख्यानमालेच्या सत्रास उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर व मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित सर्व वक्त्यांनी विविध विभागाच्या पदांच्या भरतीसंदर्भात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंकाचे निरसन केले.

         सदर व्याख्यानमालेत जिल्ह्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सदर व्याख्यानमालेचे संचालन श्रीमती स्वाती कापसे, समाज कल्याण निरीक्षक यांनी तर आभार प्रदर्शन विनोद मोहतुरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया यांनी केले. सदर मार्गदर्शन सत्राच्या यशस्वितेसाठी लक्ष्मण खेडकर, अमेय नाईक, ज्योती फुंडे, आत्माराम खंडाते व क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्याख्यानमालेच्या पुढील सत्राचा लाभ घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.