मुंबई-राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाचा यंदा 93.83 टक्के निकाल लागला आहे, अशी माहिती एसएससी बोर्डाकडून देण्यात आली आहे. यावर्षी देखील निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत.
तर यंदाही कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.
दुपारी 1 वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्याचा निकाल पाहायला मिळणार आहे. राज्यातील 15 लाख 79 हजार 371 विद्यार्थी परिक्षेत बसले होते. यापैकी 4 लाख 89 हजार 455 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह पास झाले असून, 5 लाख 26 हजार 210 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 3 लाख 34 हजार 15 विद्यार्थी हे दुसऱ्या श्रेणीत पास झाले आहेत. तर 85 हजार 288 विद्यार्थ्याचा निकाल उत्तीर्ण श्रेणीत लागला आहे. 23 हजार शाळांमधून जवळपास 6 हजार 844 शाळांचा निकाल 100 टक्के लागला. गेल्या 4 वर्षांची तुलना केली तर 2020 चा निकाल होता 95.20 टक्के 2021 चा निकाल होता 99.95 2022 चा निकाल होता 96.94 टक्के तर 2023 चा निकाल 93.83 टक्के निकाल लागला असून गेल्या 4 वर्षाच्या तुलनेने हा निकाल घटलेला दिसून येत आहे.
गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन करा अर्ज
दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यास विषयाची गुण पडताळणी करणे, उत्तरपत्रिकांची छायाप्रत मागवून पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन माध्यमातून स्वत:, शाळांमार्फत http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागवून घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर पुढील पाच दिवसांत शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. गुण पडताळणीसाठी दि. ३ ते १२ जून तसेच छायाप्रत मागविण्यासाठी दि. ३ ते २२ जूनपर्यंत या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. डेबीट, क्रेडिट कार्ड तसेच यूपीआय आणि नेट बॅंकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन शुल्क भरता येणार आहे.
विभागीय निकाल
छत्रपती संभाजीनगर : 93.23 टक्के
कोकण: 98.11 टक्के
लातूर: 92.67 टक्के
मुंबई: 93.66 टक्के
पुणे: 95.64 टक्के
नागपूर: 92.05 टक्के
कोल्हापूर: 96.73 टक्के
अमरावती: 93.22 टक्के
नाशिक: 92.22 टक्के
राज्यभरातून एकूण प्रविष्ट विद्यार्थी – 15 लाख, 29 हजार, 96
मुलांचा निकाल 92.05 टक्के
मुलींचा निकाल. 95.87 टक्के
दिव्यांगांचा निकाल. 92.49 टक्के