बारावीचा निकाल ८६.६० टक्के;कोकण विभागाची बाजी

0
9
पुणे, दि. २५ – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून राज्याचा एकूण निकाल ८६.६० टक्के लागला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी परीक्षेत बाजी मारली असून एकूण ९०.५० टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ८३.४६ टक्के विद्यार्थ्यांना यश मिळाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९३.२९ टक्के तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८३. ९९ टक्के लागला.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत १८ फेब्रुवारी ते २८ मार्च २०१६ या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांपैकी ११ लाख ४२ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या ५ लाख ३२ हजार ४८२ असून मुलांची संख्या ६ लाख १० हजार ४०० एवढी आहे.
विज्ञान विभागाचा निकाल ९३.१६ टक्के, वाणिज्य विभागाचा निकास ८९.१० टक्के तर कला विभागाचा निकाल ७८.११ टक्के इतका लागला. एकूण १६२ विषयांची परीक्षा घेण्यात आली त्यामधे १० विषयांचा निकाल १०० टक्के लागला. ९ जुलै रोजी पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.
विभागवार निकालांची यादी 
कोकण विभाग – 93%
अमरावती विभाग – 85.81%
नाशिक विभाग – 83.99%
पुणे विभाग- 87.26%
औरंगाबाद विभाग- 87.80%
नागपूर विभाग- 86.35%
मुंबई विभाग- 86.08%
लातूर विभाग- 86.28%
कोल्हापूर विभाग- 88.10%