आंतरजिल्हा बदलीतून डीएडधारकांना शिक्षण विभाग करतोय बेरोजगार

0
14

बेरार टाईम्स विशेष
गोंदिया,दि.२९-शासकीय नोकरी लागावी या हेतूने अनेक जण शिक्षण घेतात.कुणी उच्च शिक्षण घेऊन वरच्या पदावर जातो तर कुणी डीएड बीडच्या माध्यमातून शिक्षकाची नोकरी करण्याची इच्छा मनात घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करून बसतो.आज गोंदिया जिल्ह्यात हजारावर युवक डीएड,डीटीएड आणि बीएड चे शिक्षण घेऊन नोकरीच्या आशेवर बसले आहेत.गेल्या पाच दहा वर्षापासून प्राथमिक शिक्षकांच्या नोकरीची जाहिरातच निघाली नाही.उलट नोकरीची आशा दाखवीत टीईटीसारख्या परीक्षा घेऊन त्यांच्यात नोकरीची आशा जागविणारे जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग मात्र आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून शिक्षकांचे समायोजन करून भरतीकरीता रिक्त जागाच उपलब्ध ठेवत नसल्याने आजच्या घडीला गोंदियासारख्या मागास,आदिवासी व नक्षलजिल्ह्यातील डीएडधारक युवकांना नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.जे काही शिक्षक आदी डीएडचा अभ्यासक्रम करून इतर जिल्ह्यात नोकरीवर लागले ते आम्हाला स्वजिल्ह्यात यायचे आहे असे कारण पुढे करून आपल्याच जिल्ह्यातील डीएडधारक युवकांना बेरोजगार ठेवण्याचे काम करीत आहेत.गोंदिया जिल्हा स्थापनेनंतर एकदाच नोकर भरती झाली.त्यानंतर झालेली नाही.आज गोंदिया जिल्ह्याचाच विचार केल्यास पाच-दहा वर्ष झाली शिक्षकांची भरती जिल्हा परिषदेने केलीच नाही.वर्षाला १०० विद्यार्र्थी गोंदिया जिल्ह्यातील डीएड होतात हा आकडा गृहीत धरल्यास किमान एक हजाराच्या वर आकडा डीएडधारक युवक युवतींचा जातो.हे नोकरीची वाट बघत असतानाच त्यांच्यासाठी जागा रिक्त होण्याएैवजी त्या जागा आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून भरण्याचा सपाटा सुरू झाला आहे.गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीचा विचार केल्यास जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षण सभापती व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या कार्यकाळात सुमारे १२३-१२५ शिक्षक इतर जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात आणले गेले.ते १२३-१२५ शिक्षक आंतरजिल्हा बदलीतून आणले गेले नसते तर तेवढ्या जागा रिक्त दिसून नव्याने भरतीसाठी सरकारकडे परवानगी मागून जिल्ह्यातील युवकांना नोकरी उपलब्ध करून देण्याची संधी निर्माण झाली असती परंतु तसे झाले नाही.आणि त्या काळातही डीएडधारक युवक जिल्ह्यातील बेरोजगारच राहिले.आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात आंतरजिल्हा बदलीचे वारे वाहू लागले आहेत.यातही ६०-१०० चा आकडा एैकावयास मिळत आहे.जेव्हा नोकरी लागण्याची वेळ असते तेव्हा मात्र आम्ही कुठेही नोकरी करायला तयार आहोत हे सांगून नोकरी परजिल्ह्यात स्वीकारतात.मात्र तीन पाच वर्ष झाली की आई,वडील,पत्नी आठवते.हे आठवत असताना आपण ज्या जागेवर जात आहोत त्या जागेसाठीही एखादा डीएडधारक अभ्यासक्रम पूर्ण करून वाट बघत आहे,त्यालाही नोकरीची गरज आहे याचा विचार हे आंतरजिल्हा बदलीचे शिक्षक करताना कधीच दिसून आले नाही.त्यामुळेच आजच्या घडीला आंतरजिल्हा बदली शिक्षकांमुळेच जिल्ह्यातील डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरीची वाट बघणारे बेरोजगार होऊन बसले आहेत.