दोन अभियंत्यासह सहायक लेखाधिकाऱ्यांना खोलीत डांबले

0
8

मुलचेरा : जि.प. शाळांमधील स्वच्छतागृहाच्या प्रलंबित देयकावरून कंत्राटदाराकडून मुख्याध्यापकास मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा मुख्यालयातून सर्व शिक्षा अभियानात कार्यरत अभियंत्याची चमू सहायक लेखाधिकाऱ्यांना घेऊन मुलचेरा पंचायत समितीत स्वच्छतागृह प्रलंबित देयकाची माहिती घेण्यासाठी गेली होती. दरम्यान संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा मुलचेराचे पदाधिकारी व काही शिक्षकांनी जिल्हा अभियंता, तालुका अभियंत्यासह सहायक लेखाधिकाऱ्यांना खोलीत डांबल्याची घटना मंगळवारी मुलचेरा येथे घडली.

सर्व शिक्षा अभियानात कार्यरत जिल्हा अभियंता रवींद्र भरडकर, मुलचेरा तालुका अभियंता आयलावार व सहायक लेखाधिकारी विजया मरते हे तिघे जण स्वच्छतागृहाच्या कामाबाबतचे प्रलंबित देयकाची माहिती घेण्यासाठी मुलचेरा पंचायत समितीत गेले होते. या ठिकाणी शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित झाले. यावेळी चमूतील अधिकाऱ्यांनी या पदाधिकाऱ्यांशी प्रलंबित देयकासंदर्भात चर्चा करण्याचे ठरविले व तसा प्रयत्नही केला. मात्र आधी स्वच्छतागृह कामाची रक्कम द्या, त्यानंतर चर्चा करा, अशी घोषणा करून चमूतील तिघांना खोलीत डांबले. स्वच्छतागृहाच्या कामाची उर्वरित रक्कम दिल्याशिवाय तुम्हााला सोडणार नाही, शिक्षकांवर होणारी मारहाण खपवून घेणार नाही, असे मुलचेरा तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट बजाविले. त्यानंतर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती शाखा मुलचेराच्या वतीने तहसीलदार व सहायक पोलीस निरिक्षकांमार्फत मंगळवारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे मागण्यांचे निवेदन पाठविले.