‘जय’च्या शोधार्थ ५६ पथक तैनात

0
12

गोंदिया,दि.27-शेकडो किलोमीटरची भटकंती करूनही ‘त्या’चा रूबाब कायम राहायचा. त्याचा रूबाब पाहण्यासाठी हजारो पर्यटक त्याच्या अधिवासात धाव घ्यायचे. मात्र मागील दोन महिन्यापासून तो दिसेनासा झाल्यामुळे त्याचा अधिवास अस्तित्वहीन झाला आहे. ‘जय’च्या शोधासाठी वनविभाग रात्रंदिवस गस्तीवर आहे.विशेष म्हणजे सोमवारला गोंदियाच्या नागझिरा नवेगाव व्याघ्रप्रकल्प उपसंचालकाच्या कार्यालयात सर्वच वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.त्यात नागझिरा व नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पात एकुण ५६ पथके शोध घेण्यासाठी तयार करण्यात आली असून एकूण २२४ कर्मचारी व अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र ‘जय’चा अजून शोध लागलेला नाही.
या व्याघ्र प्रकल्पात रेड अलर्ट आहे. जयचा जन्म नागझिरा अभयारण्यात नोव्हेंबर २0१0 ला झाला होता व त्याने सन २0१२ – १३ ला नागझिरा अभयारण्य सोडल्याची वनविभागात नोंद आहे. नागझिरा अभयारण्यातून स्थलांतरण करून उमरेड – कर्‍हांडला अभयारण्यात आल्यानंतर या अभयारण्याला ‘जय’ नामक वाघाने प्रसिद्धीच्या झोतात आणले. मात्र आता त्याचेच अस्तित्व शोधण्याची वेळ वनविभागावर आली आहे. ‘जय’च्या बेपत्ता होण्याने वन्यजीवप्रेमी व्यथित झाले आहेत.
मागील काही महिन्यांपासून उमरेड कर्‍हांडला या राष्ट्रीय व्याघ्रप्रकल्पातील जय नामक वाघ हा बेपत्ता आहे. त्याच्या शोधासाठी वनविभाग दिवसरात्र एक करीत आहे. मात्र जयचा शोध लागला नाही. एवढेच नाही तर जयच्या गळ्यातील रेडीओ कॉलरही निष्क्रीय झाल्याने जयचा शोध लावण्यास अडचण होत आहे.
वनविभाग जवळपासची सर्वच जंगले शोधत आहे. सर्वच जंगलात हाय हलर्ट करण्यात आले आहे. जयचे नागझिरा अभयारण्य असल्यामुळे कदाचित जय हा माहेरघर असलेल्या नागझिरा अभयारण्यात तर आला नसावा अशी शंका वर्तविण्यात येत असून त्यादिशेनेही वनविभागाने शोधमोहीम हाती घेतली आहे.यात वन्यप्रेमी सुध्दा कामाला लागले तर माहिती देणार्याला 50 हजाराचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.