शिक्षकांकडून शासन निर्णयाची होळी

0
6

भंडारा ,berartimes.com दि.21: राज्य शासनाने काही दिवसापूर्वी विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान देण्याचे घोषित केले. हे अनुदान शंभर टक्के घोषित करावे या मागणीसाठी आज भंडारा जिल्हा विनाअनुदानित कृती समितीने जिल्हा परिषद येथे राज्य शासनाचा अध्यादेश जाळून निषेध केला.

मागील अनेक वर्षांपासून खासगी संस्था चालकांच्या शैक्षणिक संस्थामध्ये शेकडो शिक्षक रोजी-रोटी मिळेल या अपेक्षेने शिक्षक म्हणून तुटपूंजा मानधनावर काम करीत आहे. मात्र वर्षामागून वर्ष उलटून जात असतानाही या शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न निकाली निघालेला नाही. यासाठी शिक्षक संघटना, संस्था चालकांनी शासन दरबारी अनेकदा रेटा मारला. राज्य शासनाने १९ सप्टेंबरला पारित केलेल्या निर्णया जाचक अटी असल्याचा आरोप या कृती समितीने केला आहे. २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय चुकीचा असून तो शिक्षकांसाठी कर्दनकाळ असल्याचा आरोपही समितीकडून केल्या जात आहे. २० टक्के अनुदानाऐवजी सर्वच शाळांना सरसकट १०० टक्के अनुदान घोषित करून शिक्षकांची अवहेलना थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान (कायम) विनाअनुदानित कृती समितीचे अध्यक्ष प्रविण गजभिये, सचिव मुकूंद पारधी यांच्यासह संतप्त शिक्षकांनी २० टक्के अनुदानाचा शासन निर्णय जाळून निषेध केला.