जि.प.च्या शाळेत लोकशाही प्रक्रियेची हत्या

0
10

पालकांचा आरोपःकारवाईची मागणी

गोंदिया- देवरी तालुक्यातील मुल्ला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी समितीबाह्य व्यक्तीची निवड मुख्याध्यापिकेने स्वमर्जीने करून लोकशाही प्रक्रियेची हत्या केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याविषयीची लेखी तक्रार शिक्षणविभागातील वरिष्ठांकडे करून राजकारण करणाऱ्या मुख्याध्यापिकेवर कडक कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवरी तालुक्यातील मुल्ला येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने गेल्या १५ सप्टेंबर रोजी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य निवडीसाठी पालकसभेचे आयोजन केले होते. यासाठी सर्व पालकांना पालकसभेची नोटीस १२ तारखेला देण्यात आली. त्याप्रमाणे १५ तारखेला पालकांनी सभेच्या माध्यमातून १२ सदस्यांची निवड केली. यावेळी दुसऱ्या चार निमंत्रित सदस्यांची सुद्धा निवड करण्यात आली. या निवडीनंतर समितीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया घेणे अनिवार्य असताना सदर मुख्याध्यापिकेने पदाधिकाऱ्यांची निवड नंतर करू, असे सांगून सभा समाप्त केली. यानंतर गावातील राजकीय मंडळीच्या सल्ल्याने निवड झालेल्या सदस्यांना अपात्र घोषित करून नवीन कार्यकारिणी तयार करणार असल्याची कुणकूण काही सदस्यांना लागताच त्यांनी देवरीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. परिणामी, सदर मुख्याध्यापिकेने गेल्या २२ तारखेला तातडीने सभेचे आयोजन केले. या सभेत व्यवस्थापन समितीवर नसलेल्या आणि १५ तारखेच्या सभेत पालकांनी नाकारलेल्या माजी अध्यक्षाला मुख्याध्यापिकेने अध्यक्ष करता येण्यासाठी काही सदस्यांची दिशाभूल करून आणि त्यांचेवर दबाव आणून माजी अध्यक्षांना कायम केले. शाळा चालविण्यासाठी पैशाची गरज पडते, ती गरज तुम्ही पूर्ण करू शकत नाही आणि शालेय कामानिमित्त वारंवार अध्यक्षांना बाहेर जावे लागते, त्यामुळे माजी अध्यक्ष हेच अध्यक्ष राहतील, असा वरूनच आदेश असल्याचे सांगत मुख्याध्यापिकेने नवनियुक्त सदस्यांची दिशाभूल केली. असे करताना काही नवनियुक्त सदस्यांना मुख्याध्यापिकेने स्वतःहून समितीतून बाद केल्याचे सुद्धा सांगण्यात येते.
दरम्यान, संतप्त पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न धाडण्याचा निर्णय घेत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणविभागातील वरिष्ठांकडे तक्रार करून शैक्षणिक वातावरण बिघडविणाऱ्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी केली.

चौकशी करून कारवाई करू- गटशिक्षणाधिकारी, देवरी

या प्रकरणी देवरीचे गटशिक्षणाधिकारी किशोर भांडारकर यांना विचारणा केली असता त्यांनी तक्रार मिळाल्याचे सांगितले. एकदा निवड केलेल्या सदस्यांमधूनच पदाधिकाऱ्यांची निवड पहिल्याच दिवशी करणे आवश्यक असल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मान्य करून तक्रारीची शहानिशा करून पुढील कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.