-डॉ. संजय ढोबळे व डॉ. अमित बनसोड यांचे संशोधन नागरिकांच्या सुरक्षेसाठी समर्पित
नागपूर,१४-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी बिबटपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाविन्यपूर्ण संशोधन करीत ॲल्युमिनियमचा पिंजरा निर्माण केला आहे. विद्यापीठ पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय भौतिकशास्त्र विभागातील डॉ. अमित रमेश बनसोड यांनी मिळून हे नाविन्यपूर्ण संशोधन केले आहे.
संशोधकांनी बनविलेल्या ॲल्युमिनियमचा पिंजरा बिबट पासून नागरिकांचे संरक्षण करील तसेच पिंजऱ्यातून निघणाऱ्या आवाजामुळे बिबट पळून जाईल. यासोबत आजूबाजूच्या लोकांना देखील सतर्कतेचा इशारा प्राप्त होत नागरिक मदतीला धावून येईल. संशोधकांनी निर्माण केलेला पिंजरा जाळीदार असून डोक्यावर घट्ट बांधला जातो व पाठीवर उर्वरित भाग दोन परतीमध्ये असतो. त्यामध्ये आठ स्पीकर लागले असून पकडायला मजबूत स्टॅन्ड दिला आहे. बीबट येताना दिसताच किंवा अंगावर झडप मारेल त्याच क्षणाला पिंजरा दोन्ही हातांनी हूक ओढल्यानंतर संपूर्ण अंगाभोवताल येईल आणि त्यावरील स्पीकर सुरू होईल. खालील भागातील हुक पकडून खाली बसल्यानंतर याच वेळेत स्पीकर मधून जोरात वेगवेगळे आवाज येईल. यामध्ये वाचवा-वाचवा, ढोलाचे आवाज, ओरडण्याचे आवाज एकाच वेळी ऐकू येईल. त्यामुळे बिबट घाबरून पळून जाईल व आजूबाजूला असलेले नागरिक देखील सतर्क होईल तसेच मदतीसाठी पोहोचतील. अशाप्रकारे बिबटपासून सुरक्षित राहण्यास मदत मिळणारे संशोधन विद्यापीठाच्या संशोधकांनी केले आहे. या पिंजऱ्यापासून कोणताही त्रास होत नसून स्पीकर घरूनच चार्ज करता येतो. आपले संरक्षण होणे ही विद्यापीठाच्या संशोधनाचे महत्त्व व मुख्य उद्देश आहे.
विदर्भ व मराठवाडा भागामध्ये सद्यस्थितीत बिबट धुमाकूळ घालत असून त्यामुळे शेतीवर जाणारे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, सामान्य नागरिक, मजूर या सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले कार्य व्यवस्थित करता येत नसल्याची स्थिती आहे. मनामध्ये बिबटची धास्ती घट्ट बसली असून बिबट आपल्यावर कधी आक्रमण करेल आणि क्षती पोहोचवेल याची भीती महाराष्ट्रातील अनेक भागात निर्माण झाली आहे. विदर्भ व मराठवाड्यात बिबटने बऱ्याच व्यक्तींवर हल्ला केल्याची घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिक, जनावरे यांचे काय होईल? हा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या अंधारात किंवा दिवसासुद्धा बिबट दडून बसलेला दिसतो तसेच आक्रमण करतो. यामध्येच प्राणहानी होण्याची देखील भीती असते.
जंगल क्षेत्र दिवसं-दिवस घटत असल्याने वन्यप्राणी गावांकडे धाव घेत आहे. सोबतच उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्रता लक्षात घेता धोका वाढण्याची शक्यता आहे. शेतीची कामे होत नाही, रात्रीचे बाहेर फिरणे देखील कठीण झाले आहे. काय करावे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यासोबतच प्रशासन कोणती पाऊले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिबट दिसला तर त्याला जेरबद करून जंगलात सोडतात. मात्र, त्यांचे प्रयत्न कमी पडताना दिसून येत असून यामध्ये प्राणहानी होत असल्याचे सत्य आहे. नागरिकांची सुरक्षा व्हावी यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरले.
सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगवेगळ्या उपाययोजना होत असताना त्यात मुक्तपणे फिरणाऱ्या बिबटपासून कसे सुरक्षित रहावे हे महत्त्वाचे आहे. यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी पुढे येऊन शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्य केले पाहिजे व विद्यापीठाने समाजाच्या सुरक्षेसाठी कार्य केले पाहिजे म्हणून डॉ. संजय ढोबळे या संशोधकांनी आपला सहकारी डॉ. अमित रमेश बनसोड यांच्यासोबत ही उपाययोजना करून विद्यापीठाची सामाजिक जाणीव करून देत महत्त्वाचे कार्य करीत वरील संशोधन केले हे विशेष. या संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाचे डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
समाजपयोगी संशोधन करणारे डॉ. संजय जानराव ढोबळे व डॉ. अमित रमेश बनसोड या दोन्ही संशोधकाचे माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दिपा पानेकर यांनी अभिनंदन केले आहे.





