आमदारांनी जाणल्या गोंडवाना विद्यापीठाच्या समस्या

0
13

गडचिरोली दि.03-: काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले. मात्र या विद्यापीठाशी संबंधित अनेक प्रश्न राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. या प्रश्नाविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांनी गुरूवारी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी दीर्घ चर्चा केली. गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्वत्त समितीने गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र करण्याबाबतचा ठराव मंजूर केला आहे. हे उपकेंद्र अहेरी, चिमूर, चंद्रपूर शहर येथे होणार आहे. हा प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहे. याला वित्त विभागाचीही मंजुरी आवश्यक आहे. तसेच गोंडवाना विद्यापीठाला गडचिरोली येथे जागा उपलब्ध करून देण्याबाबतही कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र याबाबत राज्य सरकारकडून वेग देण्याच्या दृष्टीने आमदार डॉ. देवराव होळी आगामी हिवाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधणार आहे. याशिवाय कुलगुरूंनी अन्य काही समस्यांवरही आमदारांना माहिती दिली. तसेच गडचिरोली येथे कृषी महाविद्यालयाची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. मात्र या वास्तूत अजूनही महाविद्यालय स्थानांतरित झालेले नाही. कृषी महाविद्यालयाशी संबंधित विविध अडचणी कृषी महाविद्यालयाला भेट देऊन आमदार डॉ. देवराव होळी यांनी जाणून घेतल्या व या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.