‘एलआयटी’च्या स्वायत्ततेसाठी सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री

0
7

नागपूर दि. 23: लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी ही नागपुरातील सर्वात जुनी संस्था असून, तिला स्वायत्तता देण्यासाठी राज्य शासन
सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते लक्ष्मीनारायण इंस्टीट्यूट ऑफ टेक्नालॉजीच्या माजी
विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कमल सेठी, राजू मानकर, श्री. हरदास, प्रदीप
खंडेलवाल उपस्थित होते.

एलआयटीने ऑगस्ट 2016 मध्ये 75 वर्षे पूर्ण केली असून,देशातील पहिल्या पाच संस्थांमध्ये या संस्थेला स्थान मिळावे म्हणून
एलआयटी आणि राज्य शासनाकडून एकत्रित प्रयत्न करता येतील. या संस्थेला विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली जाईल. संस्थेच्या
उत्थानासाठी एलआयटीची एक समिती आणि राज्य शासन एक योजना तयार करेल. गुणवत्ता टिकवून ठेवण्यासोबत उच्च शिक्षणाचे धोरण ठरवत, त्यात कालानुरुप
नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचा कालानुरुप विकास व्हावा, नवे बदल स्विकारण्याची प्रक्रियागतीमान व्हावी यासाठी स्वायत्तता आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येंने उपस्थिती होती.त्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनही सादर करण्यात आले.