एक कोटीच्या नुकसानीचा अंदाज

0
7

गोंदिया : गोंदियाच्या हॉटेल बिंदलला लागलेल्या आगीनंतर या घटनेची कारणमिमांसा शोधण्याच्या कामी प्रशासकीय यंत्रणा लागली आहे. गुरूवारी दिवसभर सहायक निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. यात अनेक गोष्टी समोर आल्या. दरम्यान या आगीत एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.दिवसभर अनेक लोकांनी गोरेलाल चौकात येऊन जळालेल्या हॉटेलची पाहणी केली. चौकात दिवसभर लोकांची गर्दी होती. त्यामुळे येथे वारंवार वाहतूक खोळंबत होती.

सायंकाळी गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शिवाजीराव बोडखे यांनी हॉटेलची पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, सहायक पो.अधीक्षक संदीप पखाले, दोन्ही एसडीपीओ आणि शहर ठाण्याचे निरीक्षक दिनेश शुक्ला उपस्थित होते. या घटनेमागे कोणता घातपात तर नाही ना? या शंकेची त्यांनी चाचपणी केली. दरम्यान विविध यंत्रणांकडून येणाऱ्या अहवालानंतर या घटनेत कोणाचा दोष आहे हे निश्चित होईल असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणावही गुन्हा दाखल झाला नव्हता.