प्रसुतीप्रश्चात महिलेला दोन हजारात रक्ताची पिशवी

0
16

गोेंदिया दि.24- : गेल्या आठ ते दहा वर्षापासून सातत्याने चर्चेत असलेल्या शासकीय रक्तपेढीतील ढिसाळ धोरण आणि कमिशनखोरीचा गोरखधंदा कमी होत नाही. याठिकाणी अनेक समाजसेवक आणि राजकीय पक्षांच्या मंडळींनी हल्लाबोल केला. परंतु, काही दिवसांत आता पुन्हा काळाबाजार फोफावला आहे. शासकीय रुग्णांलयात दाखल असलेल्या रुग्णांना मोफत रक्त देणे क्रमप्राप्त असताना कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातून बाई गंगाबाई रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेकडून दोन हजार रुपये उकळण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. या प्रकाराकडे रुग्णालय प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांकरिता शहरातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात एकमेव शासकीय रक्तपेढी आहे. ही रक्तपेढी रुग्णांचे जीव वाचविण्यात तत्परता दाखविण्यापेक्षा आपल्याला पैसे कुठून मिळतील, याकडेच अधिक लक्ष देत आहेत. गेल्या आठ ते दहा वर्षांपूर्वी येथील रक्तपेढीत चक्क एचआयव्ही ग्रस्तांचे रक्त घेवून ते गरजू रुग्णांना विक्री केले जात होते. हे प्रकरण वरिष्ट स्तरावरून जावून पोहोचले होते. त्याची चौकशी देखील करण्यात आली. मात्र, त्यानंतर तोच प्रकार पुन्हा सुरूच राहिला.
है गौडबंगाल थांबविण्याच्या दृष्टीने येथील प्रभारींची देखील अदलाबदली करण्यात आली. परंतु, या रक्तपेढीत येणाºया प्रभारींना रक्ताची चटक लागल्यामुळे, की काय सारेच रक्ताकरिता पैसे घेवून रक्त देतात. शासकीय रुग्णालयांत प्रसुती झालेल्या महिलांना रक्ताची गरज भासल्यास ते शासकीय रक्तपेढीतून मोफत आणि विनाविलंब पुरविण्याचे निर्देश आहेत.
कवलेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाल्यानंतर प्रसूत मातेला हिमोग्लोबीन कमी असल्यामुळे बाई गंगाबाई रुग्णालयात रेफर करण्यात आले. बाई गंगाबाई रुग्णालयातील उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून रक्त आणण्यास सांगीतले. त्या महिलेच्या नातलगांनी २२ डिसेंबर रोजी शासकीय रक्तपेढीत जावून रक्ताची मागणी केली. त्या कुटुंबियांकडून तब्बल दोन हजार रुपये उकळल्यानंतर रक्ताची पिशवी देण्यात आली.
त्याचबरोबर पुन्हा एका महिलेकडून एका पिशवीकरिता दीड हजार रुपये उकळण्यात आले. रक्ताची पिवशी हातात देताना ती पिशवी रक्तदात्यांच्या कार्डवर देत असल्याचे दाखविण्यात येते. प्रत्यक्षात त्या रक्ताचे पैसे उकळण्यात येतात. हा गंभीर प्रकार येथे बिनदिक्कतपणे सुरू आहे. बाई गंगाबाई वैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक यांना हा प्रकार कसा लक्षात येत नाही, हे समजण्यापलिकडचे आहे.