शिष्यवृत्ती घोटाळा दीड हजार कोटींवर

0
21

गोंदिया,दि.१६ :शिष्यवृत्ती घोटाळा दीड हजार कोटींवर आहे. एसआयटीने शासनाला यासंदर्भात दिलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे ऑडिट जनरलनेही शिष्यवृत्तीची रक्कम योग्यरित्या वाटप करण्यात आली नसल्याचा ठपका ठेवला आहे. परंतु, एसआयटीने एजीचा आरोप फेटाळत घोटाळा झाला असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेची चौकशी करायची असताना यात राज्य शासनाची रक्कमही जोडण्यात आली. त्यामुळे हा आकडा वाढला असल्याची माहिती पुढे आली. यामुळेच एसआटीच्या अहवालावरही प्रश्नचिन्ह उस्थित करण्यात येत आहे.
शिष्यवृत्ती वाटपात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याकरता वरिष्ठ पोलिस अधिकारी के.व्येकटेशम यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय एसआयटी गठित करण्यात आली. एसआयटीला वर्ष२०१० ते २०१६ या आर्थिक वर्षात वाटप करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीबाबतची चौकशी अहवाल वर्षभरात सादर करायचा होता. त्यानुसार एसआयटीने नुकताच आपला अहवाल शासनाला सादर केला. एसआयटीने १२ टक्के कॉलेजची चौकशी करून यात १ हजार ४१५ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एसआयटीकडून दाखविण्यात आलेली ही रक्कम २००९ -१० व २०१०-११ या काळातील आहे. या काळात रक्कम पीआयएल खात्यातून देण्यात येत होती. मात्र त्यानंतर ऑनलाईनवरून वितरणास सुरुवात झाली.