सावराटोली पोलीस चौकीचा शुभारंभ १७ फेब्रुवारीला

0
10

गोंदिया,दि.१६ : गोंदिया शहरामध्ये पोलीस चौकी कार्यपध्दती पुनर्जिवित करण्याचा भाग म्हणून सावराटोली पोलीस चौकीचा शुभारंभ १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे असतील. यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती चुन्नीलाल बेंदरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
गोंदिया कृषि उत्पन्न बाजार समितीमार्फत चालविण्यात येणारे जूने मार्केट सावराटोली क्षेत्रातील नविन जागी स्थानांतरीत करण्यात आले आहे. सदर नविन मार्केटमध्ये सर्व शेतकरी, अडतदार व व्यापारी यांना त्यांना व्यापार, व्यवहार निर्भिडपणे करता यावा तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये सुरक्षीततेची भावना रुजावी या उद्देशाने आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नातून सावराटोली पोलीस चौकी शासनाने मंजूर केली आहे.
सध्या तात्पुरत्या स्वरुपात तंबूमध्ये सुरु करण्यात आलेल्या पोलीस चौकीमध्ये १ हवालदार व ३ पोलीस कर्मचारी हे शस्त्रासह रात्र-दिवस २४ तास कार्यरत राहणार असून त्याठिकाणी बिनतारी संदेश संच, वॉकीटॉकी, आर्मगाट नेमण्यात आली आहे. या चौकीमध्ये स्टेशन डायरी ठेवण्यात आली असून दररोज घडणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांची नोंद यामध्ये घेण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांनी केले आहे.