‘एमएचटी-सीईटी’ची उद्या परीक्षा

0
8
मुंबई ,दि.10- राज्य सरकारच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी “एमएचटी-सीईटी’ परीक्षा गुरुवारी (दि. 11) होणार आहे. राज्यभरातील तीन लाख 89 हजार 520 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा होईल. राज्यातील जिल्हा ठिकाणाअंतर्गत 1,110 उपकेंद्रांवर ही परीक्षा होईल. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत हजर राहण्याचे आदेश सीईटी कक्षाने दिले आहेत. उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे कक्षाने स्पष्ट केले.

या परीक्षेसाठी कक्षाने कडक निर्बंध लागू केले आहेत. यात परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्‍स सेंटर, इंटरनेट सेवा आणि दूरध्वनी बुथ परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांत मोबाईल, पेजर, लॅपटॉप, कॅल्क्‍युलेटर नेण्यास मनाई आहे. केवळ काळ्या शाईचे बॉलपेन, ऍडमिट कार्ड सोबत नेण्यास परवानगी देण्यात आली आहे.