सीईओ व ईओने करावी सेवानिवृत्तीपुर्वी चौकशी;प्रभारी बीईओचे घाईघाईत शिक्षक समायोजन

0
20

अतिरिक्त नसलेल्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या,
समायोजन शिक्षकांच्या बदल्यात आर्थिक देवाणघेवाणीची शिक्षकांत चर्चा

गोंदिया,दि.३०- पंचायत समितीमध्ये पदाधिकाèयांना विश्वासात न घेताच उद्या ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत असलेले उपशिक्षणाधिकारी व गोंदिया पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी घरडे यांनी १०-१२ शिक्षकांचे समायोजन आदेश काढल्याने खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे बेरार टाईम्सकडे आलेल्या तक्रारीनुसार ज्या शिक्षकांच्या तक्रारी नाहीत त्यांचेही समायोजन करण्यात आले.तर ज्या शाळेत शिक्षक अतिरिक्त नाहीत तेथिल शिक्षकालाही समायोजनाच्या नावावर इतर ठिकाणी पाठविण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण झाल्याच्या चर्चांना शिक्षकांमध्ये एैकावयास मिळत आहे.विशेष म्हणजे घरडे हे प्राथमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी असून गोंदिया पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारीचे पद रिक्त असल्याने त्यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला होता.त्यांच्याकडे जेव्हापासून प्रभार सोपविण्यात आला,तेव्हापासून त्यांच्या कामकाजात मोठ्याप्रमाणात गोंधळ असल्याचे बोलले जात आहे.त्यातच गोंदिया पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रात गटसमन्वय म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती वैष्णव यांच्या नावाचे आर्डर असतानाही घरडे यांनी अद्यापर्यंत त्यांना त्या गटसाधन केंद्राच्या गटसमन्वयाचा प्रभाराची जबाबदारी न सोपविता एका केंद्रप्रमुखाला सोपविल्याची चर्चा आहे.त्यातच दवनीवाडा येथील तांदुळ चोरी प्रकरणातील शिक्षकावर अद्यापही कुठलीही कारवाई पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने केलेली नाही,उलट त्या शिक्षकांची बदली समायोजनाच्या नावावर करण्यात आली.आदी अनेक विषयाकडे बघितल्यास प्रभारी गटशिक्षणाधिकारी घरडे यांच्या कारभारामध्ये गोंधळ दिसून येत असल्याने त्यांच्या कार्यकाळातील सर्व कामकाजाची चौकशी तत्काळ करण्यात यावी अशी चर्चा शिक्षकामध्ये दिसून येत आहे.सेवानिवृत्तीच्या महिन्यात प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी घेतलेले निर्णय,बदल्या आणि इतर व्यवहाराची सखोल चौकशी होणे गरजेचे झाले असून शिक्षकांच्या समायोजन प्रकरणाची सखोल चौकशीही होणे गरजेचे झाले आहे.चर्चेनुसार या समायोजन बदल्यांच्या नावावर १५-२० हजार रुपये एका केंद्रप्रमुखामार्फत गोळा करण्यात आल्याचीही चर्चा असून यात किती सत्यता आहे हे तपासणे गरजेचे झाले आहे.पंचायत समितीमधून काटी केंद्रातील २ शिक्षकांच्या बदल्या समायोजनावर करण्यात आल्या.आसोली केंद्रातील दतोरा येथील आठोले व कटरे यांची बदली करण्यात आली जेव्हा की याशाळेत अतिरिक्त शिक्षक नाहीत,आणि गावातील माहितीनुसार कुणाचीही तक्रार नाही.काटी येथील २ शिक्षक हटविण्यात आले जेव्हा तिथे आधिपासूनच संख्या कमी आहे.तर दवनीवाडा केंद्रातील अतिरिक्त असलेल्या शिक्षिकेची मात्र समायोजनात कुठेच बदली करण्यात आलेली नाही.कारंजा येथे १ शिक्षक अतिरिक्त असताना तेथील २ शिक्षकांना फुलचूरटोला व रापेवाडा येथे हटविण्यात आले,अशाप्रकारे काही शिक्षकांचे समायोजन करण्यात आले.समायोजन करतांना आधी त्याच केंद्रात नंतर शेजारील केंद्रात पाठवायचे असताना त्यालाही हरताळ फासण्यात आले.त्यातच देवरी येथील बनसोड नामक शिक्षकांची दारु पिऊन शाळेत असल्याच्या तक्रारीमुळे तिथून हलविण्यात आले.परंतु त्या शिक्षकाला अद्यापही कुठलीच शाळा दिली गेली नसल्याने त्या शिक्षकाचा वेतन निघतो कसा असे अनेक प्रश्न पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील समोर आल्याने शिक्षण विभागातील कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.ज्या १०-१२ शिक्षकांच्या बदल्या समायोजनाच्या नावावर करण्यात आल्या,त्यांची नावे शिक्षण विभागाचे अधिक्षक राऊत यांना भ्रमणध्वनी करुन विचारणा करण्यात आले असता त्यांनी टाळाटाळ करीत आपला भ्रमणध्वनीच परिचर यादवच्या हातात दिल्याने या सर्व प्रकरणात कुठेतरी गोंधळ आहे हे स्पष्ट होत असल्याने सीईओ व शिक्षणाधिकारी यांनी उद्या सेवानिवृत्त होणारे प्रभारी गटशिक्षणाधिकारी घरडे यांच्या या महिन्यातील सर्व कामकाजाची चौकशी त्यांच्या सेवानिवृत्तीपुर्वी केल्यास शिक्षण विभागातील अन्यायग्रस्त शिक्षकाना न्याय मिळू शकेल त्यांच्या कार्यकाळातील गैरकारभारही समोर नक्कीच येईल यात शंका नाही.
यासंदर्भात प्रभारी गटशिक्षणाधिकारी घरडे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी मिळालेल्या तक्रारीच्या आधारावरच शिक्षकांच्या समायोजन बदल्या करण्यात आल्याचे सागंत कुठलीही चुकीच्या बदल्या झाले नसल्याचे सांगत आपण कार्यालयात येऊन तक्रारी बघू शकता असे सांगितले.तर गोंदिया पंचायत समितीचे उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी आपल्याला शिक्षकांच्या समायोजन बदल्यासंदर्भात कुठलीच माहिती नसल्याचे सांगत आपण सभापतींना तत्काळ विचारणा करुन या सर्व प्रकरणाबाबत सीईओंशी चर्चा करतो असे सांगितले.