महात्मा फुल्यांच्या नावाने साजरा करा शिक्षक दिन-राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी

0
83

गडचिरोली, दि.३०: डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. परंतु तो लोकोत्सवाच्या रुपाने साजरा होत नाही. उलट ज्या महापुरुषांनी प्रामाणिकपणे सामाजिक परिवर्तनाचे कार्य केले, त्यांचेच लोकोत्सव साजरे होतात. महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजनांसाठी सर्वप्रथम शिक्षणाची कवाडे उघडी केली. त्यामुळे ५ सप्टेंबरचा शिक्षक दिन महात्मा फुल्यांच्या नावाने साजरा व्हावा, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे यांनी केली आहे.

रुचित वांढरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, डॉ.राधाकृष्णन यांच्या जन्माच्या ४० वर्षांपूर्वी महात्मा फुल्यांनी देशातील पहिली शाळा सुरु केली. त्यामुळे महात्मा फुले हे देशातील शिक्षणाचे आद्यजनक आहेत. त्यांच्यामुळेच भारतीयांना शिक्षणाची संधी मिळाली. शिक्षणाअभावी देशातील बहुजनांची अवस्था कशी वाईट झाली आहे, हे सर्वप्रथम ज्योतिबा फुल्यांनी सांगितले आणि एका वर्षात २० शाळा सुरु केल्या. त्यावेळी डॉ.राधाकृष्णन यांचा जन्मही झाला नव्हता. बहुजनांना शिक्षण मिळू नये म्हणून सनातनी मंडळींनी अनेक कटकारस्थाने केली. परंतु म.फुल्यांनी सनातनी मंडळींची बंदी मोडीत काढून बहुजनांना शिक्षणाची दालने उघडी करुन दिली. १९ ऑक्टोबर १८८२ रोजी सर विल्यम हंटर यांची भेट घेऊन ज्योतिबा फुल्यांनी बहुजनांच्या मुलांना वयाच्या १२व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, असे ठासून सांगितले. त्यामुळे ज्योतिबा फुल्यांचे शिक्षणविषयक कार्य बघता ५ सप्टेंबरचा शिक्षक दिन म.फुल्यांच्या नावानेच साजरा करावा, अशी मागणी रुचित वांढरे यांनी केली आहे.