शिक्षणाद्वारे गडचिरोलीचा विकास करा-पोलीस उपअधिक्षक संजीव म्हैसेकर

0
7

नागपूर, दि. २१ – गडचिरोलीच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांनीही शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा व गडचिरोली जिल्ह्याचा विकास करावा, असे आवाहन नक्षल विरोधी अभियानाचे पोलिस उपअधिक्षक संजीव म्हैसेकर यांनी केले.
आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनेंतर्गत महाराष्ट्र पोलिसांच्या गडचिरोली पोलिस दलातर्फे गडचिरोलीतील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी सहल आयोजित करण्यात आली होती. ही सहल महाराष्ट्रातील विविध प्रमुख शहरात फिरून नागपूरात आली असता नक्षल विरोधी अभियानातर्फे सुराबर्डी येथील अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
मंचावर अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य दिपक पाटील, नक्षल विरोधी अभियानाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमाकांत अडकी, पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे, डी.एन. ढवळे प्रामुख्याने उपस्थित होते.
नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे गडचिरोलीचा विकास खुंटला असल्याचे सांगत श्री. म्हैसेकर म्हणाले की, गडचिरोलीच्या विकासाची जबाबदारी भावी पिढीच्या हाती आहे. गडचिरोलीच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र हा विकास साधण्यासाठी गडचिरोलीतील विद्यार्थ्यांनीही शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे येण्याची आवश्यकता आहे. या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःचा विकासासह गडचिरोलीचा विकास करणे शक्य होईल. विद्यार्थ्यांनी नक्षलवाद्यांच्या भुलथापांना बळी न पडता आपल्या प्रगतीसाठी योग्य दिशा ठरविण्याची आवश्यकता आहे. योग्य दिशा ठरविल्यावरच इच्छाशक्तीच्या बळावर येत्या काळात गडचिरोलीचे निश्चितच चित्र बदलेले, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, गडचिरोली जिल्हा हा विकासाच्या तुलनेत राज्यातील इतर जिल्ह्यांच्या मागे आहे, असा कुठलाही न्युनगंड विद्यार्थ्यांनी बाळगू नये. गडचिरोलीतील अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करीत आहेत. त्यांचा आदर्श बाळगून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी, तसेच गडचिरोलीच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी सहलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून राज्यातील विविध शहरात भेटी दिलेल्या स्थळांची माहिती दिली, तसेच या शहरांप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याच्या विकास व्हायला हवा, असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विशेष माहिती व जनसंपर्क कक्षाचे प्रभारी सहायक संचालक हंसराज राऊत यांनी केले. कार्यक्रमात अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक एम.एम. लांबेवार, सहलीचे नेतृत्व करणारे गडचिरोलीचे महिला पोलिस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील, यशोदा कणसे, सहायक पोलिस उपनिरीक्षक रावजी मामुलकर, ज्ञानेश्वर सराफ, रवी बारसागडे, नक्षल विरोधी अभियानाचे हेड कॉन्स्टेबल दिनकर चांभारे, गडचिरोलीचे नायक पोलिस शिपाई पंकज धारणे, महिला नायक पोलिस शिपाई पुजा वाघ, कविता आदी कर्मचारी, तसेच सहलीत सहभागी झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी घेतला सहलीचा आनंद

महाराष्ट्र दर्शन सहलीत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यांमधील विविध गावातील, तसेच आश्रम शाळेत शिक्षण घेणारे ९१ विद्यार्थी सहभागी झाले होते. गडचिरोली पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या नेतृत्वात ही सहल गडचिरोली येथून निघून मुंबईला पोहचली. या ठिकाणी मंत्रालय, विधान भवन, पोलिस महासंचालक कार्यालय या सह विविध ठिकाणी भेटी देऊन शहरांच्या झालेल्या विकासाची माहिती जाणून घेतली. त्यानंतर पुणे, औरंगाबाद आदी शहरांना भेटी दिल्यानंतर ही सहल नागपूरात आली. नागपूरातील रमन विज्ञान केंद्राला भेट देऊन विज्ञानाची माहिती जाणून घेतली. तसेच विमानतळ, दिनशॉ फॅक्ट्री, आकाशवाणी, दिक्षाभूमी, अंबाझरी येथील क्रेझी क्रिस्टल यासह विविध ठिकाणी भेटी देऊन विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेऊन सहलीचा आनंद घेतला. सहभागी झालेले विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्याच्याबाहेर कधीही गेले नव्हते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याचा झालेला विकास पाहून विद्यार्थ्यांनी आपल्या गडचिरोली जिल्ह्याचाही याचपध्दतीने विकास व्हायला हवा, असा मानस व्यक्त केला. तसेच शिक्षणाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेद्वारे अधिकारी बनून गडचिरोलीच्या विकासाला हातभार लावण्याची इच्छा विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.